राजकारण मीडिया:फलटण :दिनांक:31/08/2026: प्रभाकर करचे : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वाघोशी येथे एका घरामध्ये दुर्मिळ प्रजातीचा साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये काही काळ उत्सुकता निर्माण झाली होती. याबाबत तात्काळ नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण या संस्थेशी संपर्क करण्यात आला.
माहिती मिळताच संस्थेचे प्रतिनिधी धीरज भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. सापाची पाहणी केली असता तो दुर्मिळ ‘काळतोंड्या’ अर्थात कृष्णशीर्ष साप (Dumeril’s Black-headed Snake) असल्याचे निदर्शनास आले.
संस्थेच्या प्रतिनिधींनी अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने सापाचे बचावकार्य केले. सापाला कोणतीही इजा होऊ न देता त्याची आवश्यक नोंद करण्यात आली. त्यानंतर या बिनविषारी सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
काळतोंड्या सापाचे वैज्ञानिक नाव Sibynophis subpunctatus असून हा साप पूर्णपणे बिनविषारी, लाजाळू आणि शांत स्वभावाचा आहे. फिकट तपकिरी, चॉकलेटी अथवा करड्या रंगाच्या शरीरावर काळ्या रंगाचे डोके हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
हा साप काही विषारी सापांसारखा दिसत असल्याने नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र, साप दिसताच घाबरून त्याला मारण्याऐवजी तज्ज्ञांची मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वन्यजीवप्रेमींनी सांगितले.
काळतोंड्या साप प्रामुख्याने ओलसर भाग, पालापाचोळा, दगड किंवा लाकडांच्या खाली आढळतो. स्थानिक परिसंस्थेतील अन्नसाखळी आणि नैसर्गिक संतुलन राखण्यात अशा सापांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
नागरिकांनी घरात किंवा लोकवस्तीमध्ये साप आढळल्यास स्वतः पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित अंतर ठेवून प्रशिक्षित सर्पमित्र, वन विभाग किंवा वन्यजीव बचाव पथकाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाघोशी येथील नागरिकांनी योग्य वेळी वन्यजीव बचाव संस्थेशी संपर्क साधल्यामुळे एका दुर्मिळ बिनविषारी सापाचा जीव वाचला असून, त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करता आले आहे.
