राजकारण मिडीया:सातारा:दिनांक:28/07/2026:प्रभाकर करचे : तृतीयपंथीय समाजाला संविधानाने बहाल केलेले समान हक्क प्रत्यक्षात मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन ठामपणे काम करणार असून, शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र तृतीयपंथीयापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सातारा यांच्या वतीने राजपथ येथील अलंकार हॉलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय तृतीयपंथीय व्यक्ती सक्षमीकरण शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव, विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने तृतीयपंथीय नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय आणि समान संधी मिळणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे. तृतीयपंथीय बांधवांनी विविध विभागांनी उभारलेल्या माहिती केंद्रांचा लाभ घेऊन शासनाच्या योजनांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी तृतीयपंथीय व्यक्तींवरील अत्याचार, भेदभाव, कायदेशीर संरक्षण, तक्रार निवारण व्यवस्था आणि कायदेशीर हक्कांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी सांगितले की, ‘तृतीयपंथीय धोरण-२०२४’ तसेच तृतीयपंथीय व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम, २०१९ अंतर्गत उपलब्ध योजनांचा लाभ तृतीयपंथीय नागरिकांपर्यंत पोहोचविणे, त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे.
शिबिरात जिल्हा पुरवठा विभाग, कौशल्य विकास व रोजगार विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कामगार कार्यालय, शिक्षण विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या स्टॉलद्वारे शिधापत्रिका, ई-श्रम कार्ड, शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार, कायदेशीर हक्क, कर्ज व विविध कल्याणकारी योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कांबळे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष अधिकारी श्रुती रकटे, मुख्यमंत्री फेलो प्रतीक्षा जाधव, सुवर्णा साळवे, विकास गायकवाड, मनीषा सावंत, समतादूत तसेच समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
