राजकारण मीडिया: सातारा:दि. ११/०७/२०२७ : प्रभाकर करचे: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून १५ ते १९ जुलैदरम्यान मार्गस्थ होत असून, लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. पालखी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भक्तीमय वातावरणात पार पडावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी पाटील यांनी पालखी मार्गावरील रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, शौचालये आणि वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देत, सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे अपघात होणार नाहीत यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
लोणंद परिसरात कोकण आणि कोल्हापूर भागातून येणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीचे विशेष नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच राव रामोशी पुलावरील बॅरिकेडिंगची दुरुस्ती, निरा नदी ते लोणंद मार्गावरील दुकानांचे नियोजन आणि रस्त्यालगतच्या विहिरींना सुरक्षिततेसाठी संरक्षक बॅरिकेड उभारण्याचे आदेशही देण्यात आले.
महावितरण विभागाने पालखी तळ आणि संपूर्ण मार्गावरील वीज व्यवस्था अखंडित ठेवावी तसेच विद्युत तारा तुटून कोणतीही दुर्घटना घडू नये याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत आरोग्य विभागाला फिरते दवाखाने, पुरेशा रुग्णवाहिका आणि औषधसाठा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले. गंभीर रुग्णांसाठी उपचार केंद्रांची पूर्वनियोजनाने निश्चिती करण्यासही सांगण्यात आले. पालखी मुक्कामस्थळी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविणे, दत्त घाट परिसर स्वच्छ ठेवणे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे पुरवठा करण्यावर भर देण्यात आला.
यंदाच्या वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे १,४०० बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, सर्व बसेस स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. भारत संचार निगमकडून अखंडित दूरसंचार सेवा आणि अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
पोलीस, महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वारी प्रमुखांशी सातत्याने संपर्क ठेवून वारकऱ्यांना कोणतीही अडचण भासणार नाही याची दक्षता घ्यावी. सातारा जिल्ह्यातून पालखी सोहळा भक्ती, शिस्त आणि सुरक्षिततेच्या वातावरणात मार्गस्थ करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केला.
