पंढरी ते पंजाब! संत नामदेव महाराजांच्या विचारांचा सायकलवरून जागर; १६० रायडर्सची ऐतिहासिक वारी शनिवारी फलटणमध्ये

**उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपुरातून वारीचा शुभारंभ; २१ नोव्हेंबरला फलटणमध्ये मुक्काम, २१ डिसेंबरला पंढरीत होणार समारोप**

राजकारण मीडिया:फलटण: दि. १७ : प्रभाकर करचे:भक्तीचा ध्यास, संतविचारांचा वारसा आणि सायकलच्या चाकांवरून सामाजिक प्रबोधनाचा संदेश घेऊन संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पंढरपूर ते घुमाण (पंजाब) या सुमारे अडीच हजार किलोमीटरच्या अनोख्या सायकल वारीला शनिवार, दि. २१ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तब्बल १६० सायकल रायडर्स या वारीत सहभागी होणार असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते श्री क्षेत्र पंढरपूर येथील विश्रामगृहातून या वारीचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी सायंकाळी ही संतविचारांची सायकल वारी फलटणनगरीत मुक्कामी दाखल होणार आहे.

संत नामदेव महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा देशभर प्रसार करण्याच्या उद्देशाने पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, श्री नामदेव दरबार कमेटी, श्री क्षेत्र घुमाण (पंजाब), सायकल रायडर्स असोसिएशन आणि समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सन २०२२ पासून सुरू झालेल्या रथयात्रा आणि सायकल वारीचे हे पाचवे वर्ष आहे.

यंदाच्या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे १६० सायकलपटूंचा विक्रमी सहभाग. २१ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथून प्रस्थान केल्यानंतर ही रथयात्रा आणि सायकल वारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यांतून मार्गक्रमण करीत १३ डिसेंबर रोजी पंजाबमधील श्री क्षेत्र घुमाण येथे पोहोचणार आहे. तेथे सायकल वारीचा समारोप होईल. त्यानंतर रथयात्रा हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांतून प्रवास करीत २१ डिसेंबर रोजी पुन्हा श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे.

ही वारी केवळ धार्मिक परंपरेचे दर्शन घडवणारी नसून संत नामदेव महाराजांच्या समतेच्या, भक्तीच्या आणि मानवतेच्या विचारांचा देशव्यापी जागर करणारी चळवळ ठरत आहे. संत साहित्याचा प्रचार-प्रसार, आरोग्यविषयक जागृती, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण आणि शिक्षणाचे महत्त्व अशा विविध विषयांवर सायकल रायडर्स प्रवासादरम्यान जनजागृती करणार आहेत.

या उपक्रमाची माहिती देताना भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी सांगितले की, यंदा १६० रायडर्सचा सहभाग हा वारीच्या वाढत्या लोकप्रियतेचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. संत नामदेव महाराजांचा विचार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा या उपक्रमाचा संकल्प आहे.

या पत्रकार परिषदेस पालखी सोहळा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर टेमघरे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, सचिव अॅड. विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, सदस्य राजेंद्रकृष्ण कापसे, राजेंद्र मारणे, राज्य समन्वयक गणेश उंडाळे तसेच सायकल रायडर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र पिसे आदी उपस्थित होते.

**पंढरीच्या भक्तीचा ध्वज खांद्यावर आणि संत नामदेवांचा विचार हृदयात घेऊन निघणारी ही सायकल वारी फलटणच्या भूमीत दाखल होत असल्याने शहरवासीयांसाठीही हा अभिमानाचा आणि भक्तिमय क्षण ठरणार आहे.**

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!