फलटण मार्केट यार्डातील सुविधांवर प्रश्नचिन्ह; शेतकरी व वाहनचालक त्रस्त
राजकारण मीडिया:फलटण:दिनांक:30/08/2026: प्रभाकर करचे : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील मूलभूत सुविधांबाबत शेतकरी व नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहेत. मार्केट यार्डमध्ये प्रवेश करतानाच रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने शेतीमाल घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर, पिकअप, टेम्पो व इतर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याची तक्रार आहे.
पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येणे कठीण होते. त्यामुळे अपघाताची तसेच वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजार समितीच्या प्रवेश रस्त्याचीच अशी अवस्था असल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी असलेल्या पार्किंगच्या जागेत बटाट्याचा व्यापार होत आहे . त्यामुळे बाजारात शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली वाहने नेमकी कुठे उभी करायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे खड्डेमय रस्त्यातून मार्केटमध्ये प्रवेश करायचा आणि दुसरीकडे वाहन पार्किंगसाठी जागा शोधत फिरायचे, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊ नये, अशी मागणी होत आहे.
संबंधित प्रशासनाने मार्केट यार्डच्या प्रवेश रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत तसेच शेतकऱ्यांसाठी असलेल्या पार्किंग व्यवस्थेबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मार्केट यार्ड शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी की त्यांच्या अडचणी वाढवण्यासाठी? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
