एकही पात्र मतदार वंचित राहू नये! SIR प्रक्रिया पारदर्शक ठेवा ! – मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम

राजकारण मीडिया | प्रभाकर करचे | दि. २८ मे २०२६

सातारा : आगामी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेत एकही पात्र नागरिक मतदार यादीबाहेर राहणार नाही, यासाठी प्रशासनाने काटेकोर खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धतीवर विशेष भर दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्याधिकारी उपस्थित होते.

चोक्कलिंगम यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना देताना सांगितले की, मतदार नोंदणी प्रक्रियेत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. संशयास्पद नोंदींची सखोल पडताळणी करण्यात यावी आणि २० जूनपर्यंत हेल्प डेस्क सुरू करून विशेष शिबिरे आयोजित करावीत. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून संपूर्ण प्रक्रियेची माहिती पारदर्शकपणे देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांची माहिती ग्रामपातळीपासून तहसील कार्यालयापर्यंत जाहीर करावी आणि नाव वगळण्यामागील कारणांची स्पष्ट नोंद ठेवावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. ऑनलाइन प्रक्रियेचे ज्ञान सर्व अधिकाऱ्यांना असणे आवश्यक असून बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांना सखोल प्रशिक्षण देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

याशिवाय, १० जूनपर्यंत प्रत्येक घराला घर क्रमांक देऊन त्याची अचूक नोंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक मतदाराचा अद्ययावत पत्ता, मोबाईल क्रमांक आणि नवीन छायाचित्र नोंदविण्यावरही भर देण्यात आला.

नागरिकांची कामे जलद आणि सुलभ व्हावीत यासाठी BLO यांच्याकडे कोरे अर्ज उपलब्ध ठेवावेत. नाव नोंदणीतील त्रुटी किंवा तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत संपूर्ण निवडणूक यंत्रणेने समन्वय आणि विश्वासार्हतेने काम करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!