राजकारण मीडिया | फलटण | दिनांक 25 मे 2026 | प्रभाकर करचे :फलटण तालुक्यातील ताथवडे गाव परिसरात डराडो (डसऱ्याक रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) या सामाजिक संस्थेच्या वतीने कै. ॲड. धोंडीराम अर्जुना खरात सर (निवृत्त प्राचार्य) यांच्या ६ व्या पुण्यतिथी तसेच ७६ व्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व बीजरोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न झाला. आठ दिवसांच्या स्मृतिपर्वाचे औचित्य साधत वन विभागाच्या क्षेत्रामध्ये शेकडो वृक्षांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
“एक वृक्ष लावा, निसर्ग वाचवा आणि भविष्य घडवा” या ध्येयवाक्याला कृतीची जोड देत आयोजित या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणप्रेमाचे अनोखे दर्शन घडले. वाढते प्रदूषण, घटणारी वनसंपदा आणि बदलते हवामान याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला.
यावेळी संस्थेचे डायरेक्टर ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात, डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात यांच्यासह वन विभागाचे वनरक्षक सुरज इंकर, वनसेवक गजाबा जाधव उपस्थित होते. तसेच संस्थेचे वॉलंटियर राजाराम अडसूळ, सुखदेव फुले, पंकज शिंदे, सनी नाळे, श्रीकांत गावडे, अशोक गावडे, वीरसेन सोनवणे, हिम्मतराव खरात तसेच ताथवडे गावातील जाधव, शिंदे आणि अन्य ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.
कै. ॲड. धोंडीराम खरात सर यांच्या स्मृतीला अभिवादन करत उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. “आज लावलेले झाड ही उद्याच्या पिढीसाठीची अमूल्य ठेव आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
ताथवडे परिसर हिरवाईने नटवण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरणादायी ठरत असून, डराडो एनजीओचा हा उपक्रम समाजासाठी आदर्श ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
— प्रभाकर करचे
राजकारण मीडिया, फलटण
