राजकारण मीडिया: फलटण: दिनांक:१७/०६/२०२६: प्रभाकर करचे : शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवत नागरिकांनी प्रश्न मांडण्याची परंपरा मोडीत काढत सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी थेट उळुंब गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रशासनाचा ताफा गावात पोहोचताच नागरिकांनी विविध समस्या मांडल्या आणि अनेक प्रकरणांवर जागेवरच निर्णय घेतल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला.
दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी, पुनर्वसितांच्या जमिनींचे प्रश्न, रेशनकार्ड, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा तसेच कृषीविषयक समस्या यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले.
विशेष म्हणजे, औपचारिक बैठकीऐवजी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गावकऱ्यांमध्ये मिसळून त्यांच्यासोबत साधेपणाने भोजन केले. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांमधील अंतर कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ग्रामस्थांनी प्रथमच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर थेट आपल्या अडचणी मांडल्याचे सांगितले.
उळुंब परिसरातील पर्यटन विकास, मूलभूत सुविधा आणि स्थानिक विकासकामांबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. शासनाच्या विविध विभागांना एकाच ठिकाणी आणून नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ उपाययोजना करण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.
“प्रशासन जनतेच्या दारी” ही संकल्पना केवळ घोषणांपुरती न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरविणाऱ्या या दौऱ्याची जिल्हाभर चर्चा होत असून उळुंब गावातील मुक्कामाने लोकाभिमुख प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
