राजकारण मीडिया:फलटण | दि. १२/०५/२०२६ | प्रभाकर करचे: सातारा येथे दि. १४ ते १७ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ५० व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभागांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाने आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवून वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पुरेशी व्यवस्था करावी, असे निर्देश देताना आयोजकांनी खासगी रुग्णालयांशी समन्वय साधून उपचार सुविधा व आयसीयू बेड राखीव ठेवावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडू व पाहुण्यांच्या निवासाची उत्तम व्यवस्था करण्याबरोबरच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहतील, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी आखाडा व प्रेक्षक यांच्यामध्ये बॅरिकेड्स उभारणे, पार्किंग व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि पोलिस विभागाशी समन्वय ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हेलिपॅडची पर्यायी व्यवस्था ठेवण्याबाबतही चर्चा झाली. तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत व्यवस्थेची तपासणी आणि सर्व सुरक्षा उपाययोजनांची संबंधित विभागांकडून खात्री करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
“ही स्पर्धा सातारा जिल्ह्याच्या प्रतिष्ठेला राष्ट्रीय स्तरावर नवी उंची देणारी ठरेल. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आदर्श नियोजन करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
