श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस सज्ज; पोलीस पाटील, पोलीस मित्र व स्वयंसेवकांची भक्कम साथ

राजकारण मीडिया:फलटण:दि. १४/०७/२०२६: प्रभाकर करचे:— संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व्यापक नियोजन केले असून पोलीस पाटील, पोलीस मित्र आणि विविध करिअर अकॅडमीतील स्वयंसेवकांच्या सहकार्याने सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यात आली आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १५ जुलै २०२६ रोजी सातारा जिल्ह्यात दाखल होणार असून १७ जुलै रोजी पालखीचे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगमन होणार आहे. त्यानंतर १८ जुलै रोजी बरड येथून पालखी पुढील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या कालावधीत लाखो वारकरी व भाविकांच्या उपस्थितीचा विचार करून सातारा जिल्हा पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले आहे.

या बंदोबस्तासाठी सुमारे १५० पोलीस अधिकारी, १,००० पोलीस अंमलदार, १,००० होमगार्ड यांच्यासह फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मदतीसाठी स्वरूपा करिअर अकॅडमी (फलटण), ध्येय करिअर अकॅडमी (सोमंथळी) आणि कोलवडकर अकॅडमी (वडले) येथील सुमारे ३०० प्रशिक्षित स्वयंसेवक (पोलीस मित्र) तसेच ६५ पोलीस पाटील कार्यरत राहणार आहेत.

पालखी मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, वारकऱ्यांच्या सुरक्षित हालचाली तसेच आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

दरम्यान, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी विविध करिअर अकॅडमीतील स्वयंसेवकांना पालखी सोहळ्यादरम्यान पार पाडावयाची जबाबदारी, कायदा व सुव्यवस्था राखताना घ्यावयाची काळजी, वारकऱ्यांना सहकार्य करण्याची पद्धत, आपत्कालीन प्रसंगी समन्वय राखणे तसेच शिस्त, संयम आणि सेवाभावाने कर्तव्य बजावण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. स्वयंसेवकांनी पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करून पालखी सोहळा सुरक्षित, शांततापूर्ण आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

फलटण ग्रामीण पोलीस प्रशासनाने पालखी सोहळ्यादरम्यान नागरिक, वारकरी आणि वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले असून संपूर्ण यंत्रणा २४ तास सतर्क ठेवण्यात आली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!