राजकारण मीडिया फलटण: दिनांक: २०/०६/२०२६: प्रभाकर करचे: जेजुरी येथील लोणारी समाजाच्या धर्मशाळा तसेच समाजाच्या मालकीच्या २३ एकर जमिनीच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी लोणारी समाजाचा भव्य जनआंदोलन मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनाच्या संयोजकांनी दिली आहे.
समाजाच्या मालकीच्या धर्मशाळा, सार्वजनिक मालमत्ता व २३ एकर जमिनीच्या व्यवस्थापनात पारदर्शकता राहावी, समाजाच्या मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतरण समाजाच्या व्यापक हिताला बाधक ठरू नये तसेच या मालमत्तांचा उपयोग समाजातील विद्यार्थी, युवक, खेळाडू, गरजू बांधव व भावी पिढ्यांसाठी व्हावा, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा मा.आ.रवींद्र भाऊ दंगेकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, धर्मशाळेच्या कारभाराबाबत तसेच जमिनीच्या व्यवस्थापनासंदर्भात समाजामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत असून त्याबाबत सविस्तर खुलासा व पारदर्शक माहिती समाजासमोर यावी. धर्मादाय विभागाकडेही विविध तक्रारी दाखल झाल्या असून त्याबाबत चौकशी प्रक्रिया सुरू आहे. मात्र, समाजाच्या मालमत्तेबाबत जनजागृती करणे आणि समाजाची भूमिका शासन व संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
मोर्चामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील लोणारी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून जेजुरी येथील एमआयडीसी परिसरातून धर्मशाळेपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, धर्मादाय आयुक्त, नगरविकास मंत्री, महसूल मंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासाठी निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
मोर्चा शांततापूर्ण, शिस्तबद्ध व समाजहिताच्या उद्देशाने काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले असून, समाजाच्या मालमत्तांचे संरक्षण व पारदर्शक कारभारासाठी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
