राजकारण मीडिया:फलटण: दिनांक: ०६/०७/२०२६: प्रभाकर करचे| फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भागीदारी, लीज धोरण आणि शासन निर्णयांच्या अंमलबजावणीवर माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संपूर्ण व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. कारखाना वारंवार भागीदारी किंवा लीजवर देण्याऐवजी तो सभासदांच्या स्वमालकीचा राहण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या धोरणानुसार सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्त्वावर देण्यासाठी तो कारखाना तोट्यात अथवा अवसायनाच्या स्थितीत असणे आवश्यक आहे. श्रीराम कारखाना २००६ ते २०२१ या कालावधीत भागीदारीवर देण्यात आला होता. त्यानंतर कारखाना सक्षम करून पुन्हा सभासदांकडे सोपविण्याऐवजी तिसऱ्यांदा भागीदारीचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
मंत्री समितीने कारखाना व डिस्टिलरीसाठी प्रति टन २०० रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली असताना, नंतर शासनाच्या धोरणापासून विचलित होत वेगळ्या लीज पद्धतीचा अवलंब करण्यात आला आणि त्यामुळे कारखाना व डिस्टिलरी कमी दरात चालविण्यास देण्यात आल्याचा दावा भोसले यांनी केला. या प्रक्रियेत शासन निर्णय, मंत्री समितीचे निर्देश आणि कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
दत्त इंडिया प्रकरणाचा उल्लेख करत भोसले यांनी न्यायालयीन प्रक्रियेचाही संदर्भ दिला. त्यांच्या मते, ८ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार कारखाना तोट्यात असल्याशिवाय भागीदारीचा निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तिसऱ्यांदा भागीदारी देणे कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य ठरणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
विशेष सभेत प्रति टन २०० रुपयांच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तो विषय दडपण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक, प्रशासकीय, तांत्रिक आणि कायदेशीर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
“सहकारी कारखाना हा सभासदांची सामूहिक मालमत्ता आहे. तो कोणाच्याही कायमस्वरूपी ताब्यात किंवा आर्थिक गुलामीत जाणार नाही, यासाठी सभासदांनी जागरूक राहण्याची हीच योग्य वेळ आहे. ‘विना सहकार नाही उद्धार’ ही भावना जपत कारखान्याचे सहकार तत्त्व जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे,” असे आवाहन विश्वासराव भोसले यांनी केले.
(टीप : या बातमीतील आरोप व दावे हे माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर आधारित असून, संबंधित पक्षाची भूमिका उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)
