राजकारण मीडिया:फलटण: दि.०४/०७/२०२७: प्रभाकर करचे : महाराष्ट्रात वीज ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी फलटण येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन पंतप्रधान, केंद्रीय ऊर्जामंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यपाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध घटनात्मक व प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संसदेच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याचा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती नसल्याचे विधानसभेत स्पष्ट केले असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही नव्या कायदेशीर आदेशाशिवाय वीज ग्राहकांना संदेश पाठवून आणि प्रत्यक्षात स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविणे हे कायद्याच्या चौकटीबाहेरचे असून, संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून वीज ग्राहकांवर दबाव टाकून स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा दावा करत, अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदवावेत, त्यांना सेवेतून निलंबित करावे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत स्मार्ट मीटर बसविण्याची संपूर्ण मोहीम थांबवावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय, राज्यभरातील वितरण कार्यालयांमध्ये ठेवण्यात आलेले स्मार्ट मीटर तात्काळ जप्त करून एका सुरक्षित शासकीय गोदामात सीलबंद ठेवावेत, जेणेकरून शासनाच्या स्पष्ट आदेशाशिवाय त्यांचा वापर होणार नाही, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची न्यायालयाने सुओ मोटू दखल घेऊन राज्य सरकारला संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत तसेच पोलीस प्रशासनाला गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.या निवेदनावेळी समाजसेविका सौ. रेश्मा पठाण उपस्थित होत्या.
> टीप : वरील बातमी ही निवेदनातील दावे आणि मागण्यांवर आधारित असून, संबंधित दाव्यांची स्वतंत्र शासकीय किंवा न्यायालयीन पुष्टी झालेली असल्याचे या बातमीत नमूद केलेले नाही.
