फलटणच्या डॉ. राजेंद्र रुपनवरांच्या मृत्यूने हादरले आरोग्य प्रशासन; दबाव, चौकशी आणि मानसिक छळाच्या आरोपांवर निष्पक्ष तपासाची मागणी**
राजकारण मीडिया:फलटण/मुंबई: दिनांक:01/09/202 6 : प्रभाकर करचे : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या उपचारादरम्यान झालेल्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात तीव्र खळबळ उडाली आहे. मुंबईतील सायन परिसरात २७ ऑगस्ट रोजी त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता. गंभीर अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू असताना अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
मात्र, डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूने केवळ एका तरुण डॉक्टरचा जीव घेतला नाही, तर फलटणच्या आरोग्य व्यवस्थेतील कथित दबाव, प्रशासकीय कारभार, चौकशीची प्रक्रिया आणि बाह्य हस्तक्षेपाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
“न्याय मागणाऱ्यालाच चौकशीच्या फेऱ्यात का उभे केले?”
उपलब्ध वृत्तांनुसार, बंदूक परवान्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रासंदर्भात झालेल्या वादानंतर डॉ. रुपनवर यांच्यावर दबाव व धमक्यांचे आरोप समोर आले होते. या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर मात्र डॉ. रुपनवर यांच्याविरोधातही अंतर्गत चौकशी सुरू झाल्याचे वृत्त समोर आले.
यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे—
“तक्रार करणाऱ्या डॉक्टरला संरक्षण मिळाले का, की त्यालाच प्रशासकीय चक्रात अडकवण्यात आले?”
या प्रश्नाचे उत्तर केवळ आरोप-प्रत्यारोपांतून नव्हे, तर निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीतूनच मिळणे आवश्यक आहे.
सोशल मीडियावरील संदेश आणि गंभीर आरोप
डॉ. रुपनवर यांनी मृत्यूपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यावर होत असलेल्या कथित दबावाबाबत आवाज उठवल्याचे वृत्त आहे. रुग्णालयातील अंतर्गत वाद, चौकशी आणि वरिष्ठांकडून होणाऱ्या कथित त्रासामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे आरोप विविध स्तरांतून करण्यात आले आहेत. या सर्व बाबींची सत्यता तपास यंत्रणेकडून पडताळली जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
शेवटच्या जबाबाने निर्माण केले नवे प्रश्न
या प्रकरणातील सर्वात संवेदनशील बाब म्हणजे डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूपूर्वीच्या जबाबाबाबत निर्माण झालेला वाद. पूर्वी त्यांच्या हातावर काही नावे लिहिल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र उपचारादरम्यान दिलेल्या कथित शेवटच्या जबाबात “माझी कुणाबद्दलही तक्रार नाही” असे नमूद झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.या पार्श्वभूमीवर काही राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्ता यांनी या जबाबाच्या परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत?
मात्र, हा जबाब कोणत्या परिस्थितीत देण्यात आला, त्यावेळी वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया काय होती आणि त्याची स्वतंत्र पडताळणी झाली का, याचा निर्णय तपासातूनच स्पष्ट होईल
.प्रशासनाची कारवाई; वैद्यकीय अधीक्षक निलंबित
या घटनेनंतर प्रशासनाने फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना निलंबित केले आहे. तसेच प्रकरणाची चौकशी आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
परंतु आता जनतेचा प्रश्न सरळ आहे—
“निलंबन हा शेवट आहे की सत्यापर्यंत पोहोचण्याची सुरुवात?”
नातेवाईकांचा संताप; डॉक्टर संघटनाही मैदानात
डॉ. रुपनवर यांच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. वैद्यकीय संघटनांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
संपादकीय सवाल : “व्यवस्थेने डॉक्टर वाचवला असता का?”
डॉ. राजेंद्र रुपनवर आता या जगात नाहीत. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेले प्रश्न मात्र जिवंत आहेत—
एका डॉक्टरवर नेमका किती दबाव होता?
त्यांच्या तक्रारींची वेळेत आणि गांभीर्याने दखल घेतली गेली का?
प्रशासकीय चौकशी निष्पक्ष होती का?
बाह्य दबावाचे आरोप खरे की खोटे?
त्यांच्या मानसिक तणावामागील कारणांची सखोल चौकशी होणार का?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे—दोषी कोणीही असो, कायदा त्याच्यापर्यंत पोहोचणार का?
डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूचे राजकारण करण्यापेक्षा सत्याचा शोध घेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल. आरोपांवर नव्हे तर पुराव्यांवर निर्णय झाला पाहिजे. चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे. आणि जर कोणत्याही व्यक्तीने, अधिकाऱ्याने किंवा व्यवस्थेतील घटकाने कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे सिद्ध झाले, तर त्याच्यावर निर्भय आणि कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.
“डॉक्टर गेला… आता फक्त श्रद्धांजली नको, तर सत्य आणि न्याय हवा!”
