राजकारण मीडिया:फलटण: दिनांक:१४/०५/२०२६ : प्रभाकर करचे:विहिरीवर काम सुरू असताना एका शेतकऱ्याला पाण्यात घोणस जातीचा विषारी साप पडलेला दिसून आला. साप पाहताच परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शेतकऱ्याने धाडसाने आणि जागरूकता दाखवत तात्काळ नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी च्या सर्पमित्रांशी संपर्क साधला.
माहिती मिळताच संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने विहिरीतील घोणस सापाचे रेस्क्यू करत त्याला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सापाला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.
यावेळी सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, साप किंवा कोणताही वन्यजीव आढळल्यास घाबरून जाऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी त्वरित स्थानिक बचाव संस्था किंवा वनविभागाशी संपर्क साधावा.
“प्रत्येक जीव हा निसर्गाच्या संतुलनासाठी महत्त्वाचा असून वन्यजीवांचे संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असा संदेश यावेळी संस्थेच्या सदस्यांनी दिला.
