पालखी मार्गांचा विकास म्हणजे श्रद्धा, सुरक्षा आणि आधुनिकतेचा संगम : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी फलटण शहरासाठी ९७ कोटींच्या विकासकामांची घोषणा! दिवेघाट एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण होणार!

राजकारण मीडिया, फलटण | दि. १५ मे २०२६ | प्रभाकर करचे :फलटण येथे आयोजित पालखी मार्ग पत्रकार परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेत, “वारी ही केवळ परंपरा नसून ती भारताच्या सनातन संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे. या पवित्र यात्रेला सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट केले.

वारकरी संप्रदायाच्या लाखो भाविकांना अनेक वर्षांपासून अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी आणि विशेषतः दिवेघाटातील धोकादायक प्रवासाचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग (NH-965) आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (NH-965G) यांचा व्यापक पुनर्विकास करण्यात येत असून, बहुतांश कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

सुमारे २३४ किलोमीटर लांबीच्या संत ज्ञानेश्वर पालखी मार्गासाठी तब्बल ७,६२५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आळंदी ते पंढरपूर आणि पुढे मोहळ ते वाखरी असा हा महामार्ग पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतून जातो. या मार्गावरील सहापैकी चार पॅकेज पूर्ण झाली असून, उर्वरित काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. विशेषतः दिवेघाट परिसरात दोन लेनच्या जागी चार लेनचा रुंद रस्ता उभारण्यात येत असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

गडकरी यांनी सांगितले की, पालखी मार्गांवर वारकऱ्यांसाठी स्वतंत्र ३.५ मीटर रुंदीच्या लेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सासवड, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूर या शहरांना बायपास देण्यात आल्याने गावांतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी सुमारे ४,४१६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असून, पाटस ते पंढरपूर असा १३० किलोमीटरचा हा मार्ग पुणे व सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. पाटस ते बारामती हा टप्पा पूर्ण झाला असून उर्वरित कामे प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी नमूद केले.

या दोन्ही महामार्गांच्या कामांमध्ये जलसंधारणालाही प्राधान्य देण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर ४३ तलावांचे खोलीकरण करून ३३.४५ लाख घनमीटर माती महामार्गासाठी वापरण्यात आली. त्यामुळे ३३४५ TCM अतिरिक्त जलसाठा निर्माण झाला. तर संत तुकाराम पालखी मार्ग परिसरात २५ तलावांचे खोलीकरण करून १९२५ TCM अतिरिक्त पाणी साठवण क्षमता वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सुमारे ४५०० झाडांचे ट्रान्सप्लांटेशन करण्यात आले असून, ४० हजार नवीन वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. तसेच अहिल्यादेवी विहीर आणि बाजीराव विहीर यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करूनच रस्त्यांची उभारणी करण्यात आली असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबतही माहिती दिली. निरा राईट बँक कालव्यावरील १०२.६ मीटर लांबीचा सिंगल स्पॅन पूल हा देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नमुना असल्याचे त्यांनी सांगितले. या पुलासाठी UHPFRC (Ultra High Performance Fibre Reinforced Concrete) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, स्टील सळईऐवजी स्टील फायबर्सचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी फलटण शहरासाठी ९७ कोटी रुपयांच्या “वन टाइम इम्प्रुव्हमेंट” योजनेची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत शहरातील अरुंद रस्ते, राव रामोसे पूल रुंदीकरण, वाहतूक व्यवस्थापन आणि पालखी काळातील सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. यासोबतच निरा रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिज, जेजुरी फ्लायओव्हर, टेंभुर्णी-पंढरपूर महामार्ग आणि पंढरपूर रिंग रोड प्रकल्पांची घोषणाही करण्यात आली.

“श्रद्धा, सुरक्षितता आणि विकास यांचा समतोल साधणारे हे पालखी मार्ग भविष्यात देशासाठी आदर्श मॉडेल ठरतील,” असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!