ट्रान्सफॉर्मर चोरांचा ‘वीजफ्यूज’ उडाला!फलटण ग्रामीण पोलिसांचा दणका; रेकॉर्डवरील दोन आरोपी ताब्यात, तब्बल ५ ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे उघड

राजकारण मीडिया:फलटण: दिनांक: 10/09/2026 :प्रभाकर करचे | शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याचा कणा असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या तपासात रेकॉर्डवरील दोन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून, पाच ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांनी त्रस्त झालेल्या शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे राज मिथुन शिंदे, रा. राजाळे, ता. फलटण आणि सनी रमण भोसले, रा. सरडे, ता. फलटण यांच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.

चौकशीच्या ‘कडक’ फेऱ्यात कबुलीचा दावा

पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी तसेच त्यांच्या साथीदारांच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट होताच एकापाठोपाठ एक पाच गुन्हे उघडकीस आले.

या प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(4) तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलम 136 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पाच गुन्ह्यांचा तपास; मुद्देमालही जप्त

फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित प्रकरणांतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, उर्वरित आरोपी किंवा साथीदारांचा सहभाग आहे का, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे मागील काही महिन्यांत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर व मोटार चोरीचे एकूण 19 गुन्हे उघडकीस आणल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विद्युत उपकरणांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम सुरू केल्याचे चित्र आहे.

‘ट्रान्सफॉर्मर चोरी’ म्हणजे केवळ लोखंडाची चोरी नव्हे!

ट्रान्सफॉर्मर चोरी झाल्यानंतर केवळ विद्युत उपकरणाचे नुकसान होत नाही, तर शेतकऱ्यांचा सिंचनाचा खोळंबा, पिकांचे नुकसान आणि आर्थिक फटका बसतो. त्यामुळे अशा चोरीकडे साधी मालमत्ता चोरी म्हणून न पाहता ग्रामीण अर्थव्यवस्थेला बाधा आणणारा गंभीर प्रकार म्हणून पाहण्याची गरज आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे “शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मरवर हात टाकाल, तर कायद्याचा हात तुमच्यापर्यंत पोहोचेल” असा स्पष्ट संदेश चोरट्यांना मिळाला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतूरे , अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम ,तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस यांच्या पथकाने केली असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

राजकारण मीडिया | फलटण

ट्रान्सफॉर्मर चोरीचा छडा लागला; आता ‘चोरां’च्या संपूर्ण साखळीपर्यंत तपास पोहोचणार का?

हा प्रश्नही या कारवाईनंतर चर्चेत आला आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या चोरीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, चोरीचा माल कुठे आणि कोणामार्फत विकला जात होता, याचा उलगडा होणे अपेक्षित आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!