“फलटण मार्केट कमिटीत सेसचा काळाबाजार? पावत्यांशिवाय वसुलीचा उघड ‘खेळ’! शेतकरी व खरेदीदार लुटला जातोय का?”

🗞️ राजकारण मीडिया | फलटण | दिनांक: 14 एप्रिल 2026 | प्रभाकर करचे:फलटण येथील Agricultural Produce Market Committee मध्ये मार्केट सेस वसुलीच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित “काळ्या खेळा”ने शेतकरी आणि खरेदीदारांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. कमिशन एजंट कडून सेस घेतला जातो, पण पावती दिली जात नाही — हा प्रकार केवळ अनियमितता नसून सरळसरळ आर्थिक गैरव्यवहार असल्याचा आरोप उघडपणे होत आहे.

बाजारात माल विक्री करताना खरेदीदारकडून व शेतकऱ्यांकडून सेस वसूल केला जातो. मात्र त्याबदल्यात अधिकृत पावती नाकारली जाते. परिणामी, “पैसे गेले कुठे?” हा मूलभूत प्रश्न अनुत्तरित राहतो. या व्यवहारांची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याने लाखो रुपयांचा हिशोब गायब होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खरेदीदारांनीही संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले, “सेस घेतला जातो, पण पुरावा दिला जात नाही. हा प्रकार थांबला नाही तर आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारू.” दरम्यान, काही जाणकारांच्या मते, “पावतीशिवाय वसुली म्हणजे सरळसरळ काळा पैसा तयार करण्याचा मार्ग” असून यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय बळावत आहे.

नियम स्पष्ट सांगतात की, प्रत्येक सेस वसुलीवर अधिकृत पावती देणे बंधनकारक आहे. मात्र फलटण मार्केट कमिटीत नियमांना जणू हरताळ फासला जात आहे. “मार्केट कमिटी कंगाल आणि काहींची तिजोरी मालामाल” अशी उपरोधिक चर्चा बाजारात रंगू लागली आहे.

या सर्व प्रकाराकडे संबंधित अधिकारी डोळेझाक करत असल्याचा आरोपही पुढे येत असून, “ही केवळ दुर्लक्ष नाही, तर संगनमत आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. जर तात्काळ चौकशी झाली नाही, तर हा प्रकार मोठ्या आर्थिक घोटाळ्यात रूपांतरित होण्याची भीती व्यक्त होत आहे.

⚖️ शेतकरी-खरेदीदारांच्या ठाम मागण्या:

पावतीशिवाय सेस वसुली तात्काळ बंद करावी

मागील व्यवहारांची चौकशी करून हिशोब जाहीर करावा

दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत

सर्व व्यवहार ऑनलाईन व पारदर्शक करावेत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!