राजकारण मीडिया | फलटण | दि. 16 मार्च 2026प्रभाकर करचे :फलटण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात रंगलेल्या राजकीय हालचालींना अखेर नाट्यमय वळण मिळाले. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका, गुप्त चर्चा आणि पडद्यामागील राजकीय डावपेचांचा शेवट ‘राजकीय सेटलमेंट’मध्ये झाला असून सभापतीपदी भाजपच्या शिवांजली विक्रमसिंह भोसले तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल सस्ते यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडीनंतर फलटण तालुक्यातील राजकीय वातावरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. निवडणुकीपूर्वी विविध गटांकडून जोरदार राजकीय हालचाली होत असतानाच शेवटच्या क्षणी सर्वानुमते निर्णय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिणामी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आणि पंचायत समितीच्या सत्तासमीकरणात नवा अध्याय सुरू झाला.
दरम्यान, या निवडीनंतर राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे. सभापती म्हणून निवड झाल्यानंतर शिवांजली भोसले यांच्या वडील विक्रमसिंह भोसले यांनी तीन पंचायत समिती सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवांजली भोसले यांच्या सभापतीपदी निवडीमागे भाजपची रणनीती निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे, तर उपसभापतीपदी अमोल सस्ते यांची निवड ही शिवसेनेची राजकीय उपस्थिती मजबूत करणारी ठरली आहे. परिणामी फलटण तालुक्यात ‘सेटलमेंट पॉलिटिक्स’ आणि बदलत्या सत्तासमीकरणाची चर्चा अधिकच रंगू लागली आहे.
दरम्यान, पंचायत समितीच्या या नव्या नेतृत्वासमोर तालुक्यातील विकासकामांना गती देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तसेच या बदलत्या सत्तासमीकरणाचा आगामी काळातील फलटणच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
