कोळकीतील गट क्रमांक 79/1/1, 79/1/5 व 80/1 प्रकरण; शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाने पोलिस तपासाला वेग — तिघांना अटक, पाच संशयित फरार
राजकारण मीडिया:फलटण:दिनांक:21/08/2026:प्रभाकर करचे : कोळकी येथील जमिनींच्या वर्ग-2 मधून वर्ग-1 करण्याच्या प्रक्रियेत कथित बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांनी फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रणधीर धनसिंगराव भोईटे यांच्यासह निखील रामदास देवकर, प्रविण ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, अभिजीत तुकाराम इंगळे, राजेंद्र सदाशिव कापसे, विक्रम महादेवराव झांजुर्णे आणि विरेंद्र विक्रम झांजुर्णे अशा आठ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोळकी येथील गट क्रमांक 79/1/1, 79/1/5 व 80/1 या जमिनी भोगवटादार वर्ग-2 मधून वर्ग-1 करण्यासाठी जून 2025 मध्ये तहसील कार्यालयात अर्ज करण्यात आला होता. या अर्जासोबत सहायक दुय्यम निबंधक वर्ग-2, फलटण यांच्या कार्यालयाचा शिक्का असलेला 19 जून 2025 रोजीचा मूल्यांकन दाखला सादर करण्यात आला होता.
या दाखल्याच्या आधारे संबंधित जमिनींचे एकूण मूल्यांकन 35 लाख 1 हजार रुपये निश्चित करण्यात आले. त्यापैकी 50 टक्के म्हणजे 17 लाख 50 हजार 500 रुपये नजराणा रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आली. त्यानंतर 26 जून 2025 रोजी संबंधित जमिनीवरील भोगवटादार वर्ग-2 चा शेरा कमी करून जमीन वर्ग-1 करण्याचा आदेश पारित करण्यात आला.
मात्र, या संपूर्ण प्रक्रियेला त्यानंतर संशयाची किनार लागली. संबंधित मूल्यांकन दाखला बनावट असल्याची तक्रार करण्यात आली. सहायक दुय्यम निबंधक वर्ग-2, फलटण यांनीही संबंधित मूल्यांकन दाखला बनावट असल्याचा अहवाल तहसील कार्यालयास सादर केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर तहसील प्रशासनाने संबंधितांना नोटिसा बजावून खुलासे मागविले. नव्याने करण्यात आलेल्या मूल्यांकनात गट क्रमांक 79/1/1 व 79/1/5 या क्षेत्राचे मूल्यांकन 43 लाख 33 हजार रुपये, तर गट क्रमांक 80/1 मधील क्षेत्राचे मूल्यांकन 33 लाख 26 हजार रुपये, असे एकूण 76 लाख 59 हजार रुपये निश्चित झाल्याचे समोर आले.
नव्या मूल्यांकनानुसार 50 टक्के नजराणा रक्कम 38 लाख 29 हजार 500 रुपये इतकी होत असताना, उर्वरित 20 लाख 80 हजार रुपये 30 ऑगस्ट 2025 रोजी रणधीर धनसिंगराव भोईटे यांच्याकडून शासकीय तिजोरीत जमा करण्यात आल्याचे नमूद आहे. त्यानंतर 2 सप्टेंबर 2025 रोजी संबंधित गटाबाबत दुरुस्ती आदेश पारित करण्यात आला.
या प्रकरणात शासनाच्या महसुलाचे नुकसान झाले नसल्याचे नमूद असले, तरी बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतरही प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली. अखेर 15 जून 2026 रोजी स्वतंत्र तक्रार अर्ज करून कथित बनावट मूल्यांकन दाखल्याचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला.
तहसीलदारांच्या प्राधिकृत आदेशानंतर निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आठ संशयितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील रणधीर धनसिंगराव भोईटे, विक्रम महादेवराव झांजुर्णे आणि राजेंद्र सदाशिव कापसे यांना अटक करण्यात आली असून, निखील रामदास देवकर, प्रविण ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, अभिजीत तुकाराम इंगळे आणि विरेंद्र विक्रम झांजुर्णे हे पाच संशयित फरार असल्याचे वृत्त आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कथित बनावट मूल्यांकन दाखला नेमका कोणी तयार केला? त्यावर शासकीय कार्यालयाचा शिक्का व अधिकृत स्वरूप कसे आले? तो तहसील कार्यालयात कोणी सादर केला आणि त्यामागील नेमका उद्देश काय होता? या प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.
महत्त्वाचे : वरील सर्व आरोप हे तक्रार व उपलब्ध वृत्तानुसार आहेत. संबंधित व्यक्तींविरुद्धचे आरोप न्यायालयीन तपासणीत सिद्ध होईपर्यंत त्यांना कायद्यानुसार निर्दोष मानले जाते.
