राजकारण मीडिया: फलटण:दिनांक:01/08/2026 :प्रभाकर करचे | सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सस्तेवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ₹२ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य तिघांविरुद्धही महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान १ ऑगस्ट २०२६ रोजी सस्तेवाडी (ता. फलटण, जि. सातारा) येथे काही इसम गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या पथकाने छापा टाकला.
कारवाईदरम्यान २८० लिटर गावठी हातभट्टीची विषारी दारू, दोन लोखंडी कढई, काळे-पांढरे रंगाचे ड्रम, बाभळीच्या झाडाखाली ठेवलेला गुळाचा साठा, तुरटी व दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य असा एकूण ₹२,४६,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात पियुष रमेश चव्हाण (रा. सोमवार पेठ, फलटण) याला अटक करण्यात आली आहे. तसेच कृष्णा ऊर्फ पप्प्या विश्वास पवार, गणेश मोहिते आणि रुपेश चव्हाण (पूर्ण नाव माहिती नाही), सर्व रा. सोमवार पेठ, फलटण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार , तसेच पोलीस कर्मचारी अमोल जगदाळे पो.हवा. ब. नं. १२९, खरात 2707, 19 चतुरे , १४२३ कदम आणि पो.कॉ. २४८९ दडस यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.
फलटण ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू निर्मिती, विक्री व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले असून, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांची माहिती नागरिकांनी पोलिसांना गोपनीयपणे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे
