चटणीचा मारा ते मोटार चोरीचा पर्दाफाश! विडणीतील ८ शेतकरी मोटार चोरीचे गुन्हे उघड! ४.८० लाखांचा मुद्देमाल जप्त!

राजकारण मीडिया: फलटण: दिनांक:20/08/2026:प्रभाकर करचे:विडणी ता. फलटण येथील महिलेला भररस्त्यात अडवून तिच्या डोळ्यांत चटणी टाकत गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने लुटणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत विडणी परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटार चोरीच्या तब्बल ८ गुन्ह्यांचा छडा लावला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या मोटार चोरीच्या घटनांमागील धागेदोरे उघडकीस आले असून, आरोपीकडून ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता विडणी येथील २४ फाटा परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अर्थव ऊर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने विडणी भागात शेतकऱ्यांच्या मोटार चोरीचे ८ गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या कबुलीच्या आधारे पोलिसांनी संबंधित चोरीच्या गुन्ह्यांचा तपास पुढे नेत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.

दहा दिवसांत गुन्हे उघडकीस आणण्याची पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत एकूण १४ गुन्हे उघडकीस आणल्याचे पोलिसांच्या पत्रकात नमूद आहे. यामध्ये जबरी चोरीसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली दाखल असलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

मंगळसूत्र चोरीच्या तपासातून पुढे आलेल्या मोटार चोरीच्या धाग्यामुळे विडणी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतातील मोटारी चोरीला जाण्याच्या घटनांमुळे त्रस्त असलेल्या शेतकरी वर्गाला पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला असून, चोरीला गेलेल्या मोटारी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास

ही उल्लेखनीय कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनांनुसार करण्यात आली.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, सचिन वावरे, विक्रम बनकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांच्या कारवाईने चोरट्यांना इशारा

विडणी परिसरात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या मोटारी चोरीला जाण्याच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, एका जबरी चोरीच्या तपासातून मोटार चोरीच्या गुन्ह्यांची मालिका उघडकीस आणत पोलिसांनी “गुन्हा केला तर कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही” असा स्पष्ट संदेशच दिला आहे.

या कारवाईमुळे केवळ एक आरोपी पकडला गेला नसून, चोरीच्या घटनांमागील संपूर्ण गुन्हेगारी साखळीचा तपास करण्याची गरजही अधोरेखित झाली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची व अन्य संभाव्य गुन्ह्यांशी असलेली सांगड तपासात पुढे येण्याची शक्यता आहे.

फलटण ग्रामीण पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे विडणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून स्वागत होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!