राजकारण मीडिया:सातारा :दि.११/०७/२०२७: प्रभाकर करचे: भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR-2026) मोहिमेत पाटण तालुक्यातील अतिदुर्गम नाणेल गावाने उल्लेखनीय यश संपादन करत सातारा जिल्ह्यात मानाचा पहिला क्रमांक पटकावला आहे. गावातील मतदारांच्या गणना प्रपत्रांचे (EF) शंभर टक्के ईएफ डिजिटायझेशन पूर्ण करणारे नाणेल हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले असून, हे यश बीएलओ आशाराणी रामचंद्र यमकर यांच्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत जिल्हाभर विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बीएलओमार्फत घरोघरी भेट देऊन मतदारांचे गणना फॉर्म भरून घेत त्याचे तत्काळ डिजिटल नोंदणीचे काम सुरू आहे. अतिदुर्गम व डोंगराळ भागातील नाणेल गावात हे काम वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करून आशाराणी यमकर यांनी जिल्ह्यासमोर आदर्श निर्माण केला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते आशाराणी यमकर यांना प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाणेल गावातील एकूण २४७ मतदारांपैकी २४४ मतदारांचे ईएफ डिजिटायझेशन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित तीन मतदारांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दोन मतदार स्थलांतरित असल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे आणि तहसीलदार अनंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील इतर बीएलओंसाठी नाणेल गावाचा आदर्श प्रेरणादायी ठरत आहे.
