“उन्हाच्या झळांतही हिरवळ जपण्याचा ध्यास! ताथवड्यात वृक्षसंवर्धनासाठी अनोखा उपक्रम” !🌿

राजकारण मीडिया:ताथवडे, फलटण : दिनांक: ०१/०६/२०१६| प्रभाकर करचे: वृक्षारोपण करणे जितके महत्त्वाचे, तितकेच त्या रोपांचे संगोपन आणि संवर्धन करणे आवश्यक असते, याची प्रचिती ताथवडे येथे पाहायला मिळाली. दि. 31 एप्रिल 2026 रोजी ताथवडे (ता. फलटण) येथील वनविभाग हद्दीत नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांच्या पुढाकारातून मागील वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांना पाणी देण्याचा संवर्धन उपक्रम उत्साहात पार पडला.

तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर झाडांना पाण्याची गरज ओळखून संस्थेचे सदस्य प्रत्यक्ष डोंगराळ परिसरात पोहोचले आणि प्रत्येक रोपाला काळजीपूर्वक पाणी देत त्यांच्या जतनाची जबाबदारी निभावली.

या पाहणीत खैर, करवंद, बेहडा आणि पांगारा या स्थानिक प्रजातींची झाडे परिसरात जोमाने वाढत असल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले. कमी पाण्यातही तग धरून राहणाऱ्या या प्रजाती डोंगराळ भागासाठी उपयुक्त असून स्थानिक पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठीही महत्त्वपूर्ण मानल्या जातात.

आज अनेक ठिकाणी वृक्षारोपण केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित राहत असताना, ताथवड्यातील हा उपक्रम ‘झाडे लावा आणि ती जगवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणारा ठरला आहे.

या उपक्रमासाठी झाडांना पाणी देण्याच्या कार्यास डॉ. ऋषिकेश राजवैद्य यांनी मोलाचे आर्थिक सहाय्य दिले. त्यांच्या सहकार्याबद्दल संस्थेतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

“वृक्षारोपण ही सुरुवात असते; पण संवर्धनातूनच हिरवे भविष्य घडते,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

🌱 निसर्ग जपला तरच उद्याची हिरवाई टिकणार… ताथवड्यातील हा उपक्रम पर्यावरणप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!