फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ! गावठी हातभट्टी उद्ध्वस्त! लाखोंचा मुद्देमाल जप्त व नष्ट!

राजकारण मीडिया:फलटण दि. ३१/०५/२०२६ : प्रभाकर करचे: अवैध दारू व्यवसायाविरोधातील मोहिमेला अधिक धार देत फलटण ग्रामीण पोलिसांनी सस्तेवाडी परिसरात गावठी हातभट्टीच्या अड्ड्यांवर धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत फलटण ग्रामीण पोलिसांना सस्तेवाडी (ता. फलटण, जि. सातारा) परिसरात काही व्यक्ती गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची पडताळणी करून पोलिसांनी दोन ठिकाणी नियोजनबद्ध छापे टाकले.

छाप्यात तब्बल १६०० लिटर मुरवण, दोन लोखंडी कडई तसेच जळण साहित्य असा अंदाजे १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा अवैध साठा जप्त करून नष्ट केला असून, या प्रकरणी संजय श्याम पवार व अर्जुन श्याम पवार (रा. सोमवार पेठ, फलटण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कायद्याला हरताळ फासणाऱ्या अवैध दारू व्यवसायाविरोधात फलटण ग्रामीण पोलिसांची मोहीम पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. तसेच, अवैध धंद्यांविषयी नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवून तत्काळ कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी नमूद केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्परपोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, यांच्या सूचनानुसार ,पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ व पोलिस हवालदार अमोल जगदाळे, नितीन चतुरे, हनुमंत दडस, तुषार नलावडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!