राजकारण मीडिया:पुणे:दि. ९ जुलै २०२६ : प्रभाकर करचे :संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही सहभागी झालेल्या जय हनुमान दिंडी, सोमंथळी यांना येरवडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिंडीच्या वतीने येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) शुभांगी चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यादरम्यान आज, दि. ९ जुलै २०२६ रोजी सकाळच्या न्याहारीसाठी दिंडीचा मुक्काम येरवडा पोलीस ठाणे, पुणे येथे झाला होता. यावेळी दिंडीतील वारकऱ्यांच्या सोयीसुविधा, शिस्तबद्ध नियोजन, सुरक्षा आणि सहकार्याबाबत येरवडा पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या या सेवाभावाचा गौरव म्हणून दिंडीच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी दिंडीच्या वतीने फौजी हनुमंत हास्पे, मधुकर वाबळे, विलास सत्रे, विलास गावडे, कांतीलाल जगदाळे, विलास यादव, शशिकांत यादव, मोहन खलाटे, सोमनाथ सस्ते तसेच ह.भ.प. गावडे ताई यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व पीएसआय शुभांगी चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी वारकरी आणि पोलिसांमधील समन्वय, परस्पर सहकार्य आणि सेवाभावाचे दर्शन घडले. पालखी सोहळ्यासारख्या भव्य धार्मिक परंपरेत पोलीस प्रशासनाने बजावलेली जबाबदारी आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेले योगदान समाजासाठी प्रेरणादायी असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
