राजकारण मीडिया, फलटण :दिनांक:२०/०६/२०२६: प्रभाकर करचे : वाढते वायू प्रदूषण, घटती हरितक्षेत्रे आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सामाजिक स्तरावर ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. याच उद्देशाने नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांच्या पुढाकारातून आगामी जुलै महिन्यात फलटण शहरात व्यापक सामूहिक वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत शहरातील प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, गणेशोत्सव मंडळांची जागा, नागरिकांच्या वर्दळीची ठिकाणे तसेच सावलीची आवश्यकता असलेल्या परिसरांमध्ये देशी व दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या या मोहिमेमुळे शहरातील हरित आच्छादन वाढण्यास मदत होणार असून वायू प्रदूषण नियंत्रणासाठीही सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत.
संस्थेच्या वतीने नागरिक, सामाजिक संस्था, युवक मंडळे, गणेशोत्सव मंडळे तसेच विविध संघटनांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षारोपणासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणाऱ्या आणि लागवडीनंतर झाडांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या घटकांना संस्थेमार्फत मोफत रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
विशेष बाब म्हणजे शहरभरातील सर्व वृक्षांचे रोपण एकाच दिवशी करण्यात येणार असून त्यानंतर वृक्षांच्या वाढीचे निरीक्षण, संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची सातत्यपूर्ण जबाबदारी असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
“आज लावलेले झाड उद्याच्या पिढ्यांसाठी शुद्ध हवा, सावली, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणीय समृद्धीचा आधार ठरेल,” असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि हिरवेगार फलटण घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : 7020218247 / 9766550890 / 7588532023.
