शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! राज्यस्तरीय पीक स्पर्धेची रणधुमाळी; लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी

राजकारण मीडिया:फलटण:दिनांक;29/07/2026 :प्रभाकर करचे | राज्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या नवकल्पना, मेहनत आणि विक्रमी उत्पादनाला योग्य व्यासपीठ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने खरीप हंगाम २०२६ राज्यस्तरीय धान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धेची घोषणा केली आहे. यंदा प्रथमच संपूर्ण अर्ज प्रक्रिया स्वतंत्र ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येणार असून, पात्र शेतकऱ्यांनी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय, फलटण यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर विजेत्यांची निवड होणार असून, लाखोंच्या बक्षिसांसह राज्यस्तरीय गौरवाची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

११ पिकांचा समावेश

यंदाच्या खरीप पीक स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या ११ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

पात्रता काय?

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे व त्या जमिनीवर स्वतः शेती करणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला एका वेळी एका पिकासाठीच सहभाग घेता येणार आहे. भातासाठी किमान २० गुंठे, तर इतर पिकांसाठी किमान ४० गुंठे क्षेत्र लागवडीखाली असणे बंधनकारक आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

७/१२ उतारा

प्रवेश शुल्क भरल्याची पावती

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत

अर्जाची अंतिम मुदत

मूग व उडीद: ३१ जुलै २०२६

भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल: ३१ ऑगस्ट २०२६

प्रवेश शुल्क

सर्वसाधारण गट : ₹३००

अनुसूचित जमाती (आदिवासी) गट : ₹१५०

बक्षिसांची आकर्षक रक्कम

तालुका स्तर: प्रथम ₹५,०००, द्वितीय ₹३,०००, तृतीय ₹२,०००

जिल्हा स्तर: प्रथम ₹१०,०००, द्वितीय ₹७,०००, तृतीय ₹५,०००

राज्य स्तर: प्रथम ₹५०,०००, द्वितीय ₹४०,०००, तृतीय ₹३०,०००

कृषी विभागाने शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, फलटण येथे संपर्क साधता येईल.

— राजकारण मीडिया

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!