पात्र मतदार वंचित राहू नये, अपात्र नावाला स्थान मिळू नये’ — जिल्हाधिकारी संतोष पाटील

राजकारण मीडिया:सातारा: दि. ०३/०७/२०२६ : प्रभाकर करचे: मतदार यादी शंभर टक्के अचूक, विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत. पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होईल आणि अपात्र व्यक्तींची नावे वगळली जातील, यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तात्काळ कामाला सुरुवात करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या विशेष मोहिमेसाठी जिल्हाभरात सुमारे ३,५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, हे काम राष्ट्रीय जबाबदारी म्हणून पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. ग्रामीण भागातील पुनरिक्षणाची जबाबदारी प्रभावीपणे पार पडण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मतदार पुनरिक्षणासाठी नियुक्त शिक्षकांना आवश्यक ती कार्यमुक्ती देण्यात यावी, तसेच त्यांच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या इतर शिक्षकांनी सांभाळाव्यात, असे निर्देश देत जिल्हाधिकाऱ्यांनी पुनरिक्षण मोहिमेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट केले.

घरभेटीदरम्यान नागरिकांच्या कागदपत्रांची बारकाईने पडताळणी करून प्रत्येक नोंद अचूक असल्याची खात्री करावी. कोणताही पात्र मतदार यादीपासून वंचित राहणार नाही आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचे नाव यादीत राहणार नाही, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आणि पारदर्शकपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!