राजकारण मीडिया:फलटण: दि. १३/०७/२०२६ : प्रभाकर करचे: आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन पुण्याकडे परतणाऱ्या एका वारकऱ्याला मध्यरात्री दगडफेक करून गोंधळ निर्माण करत बेशुद्ध पाडल्याचा फायदा घेत अज्ञातांनी रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), ३११, ३२४(४) व ३(५) अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी त्र्यंबक अश्रुबा कोळेकर (वय ७२, व्यवसाय – शेती, रा. मोरवड, ता. वडवणी, जि. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते दि. ५ जुलै २०२६ रोजी पंढरपूरहून पुण्याकडे परतत होते. दि. ६ जुलै २०२६ रोजी पहाटे १.०० ते १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी मौजे काशीदवाडी, ता. फलटण, जि. सातारा, पुणे–पंढरपूर महामार्गालगत विश्रांती घेतली होती.
यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. त्यानंतर फिर्यादी बेशुद्ध पडल्याचा फायदा घेत त्यांच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून त्यातील ₹७० हजारांची रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर फिर्यादी यांनी तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली होती. मात्र जखमी अवस्थेमुळे त्यावेळी औपचारिक तक्रार नोंदविणे शक्य झाले नाही. त्यानंतर दि. १२ जुलै २०२६ रोजी त्यांनी उपस्थित राहून अज्ञात आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईची लेखी तक्रार दिल्यानंतर रात्री ८.४६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे या करीत असून, जबरी चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
