राजकारण मीडिया:सातारा : दिनांक:२४/०५/२०२६: प्रभाकर करचे:सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करून कथित ‘डिजिटल अरेस्ट’ आणि बनावट ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटरचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि कोरेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कोरेगाव–रहिमतपूर मार्गावरील सुभाषनगर येथील एका अपार्टमेंटवर छापा टाकला. या कारवाईत १७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
२३ मे रोजी उघड झालेल्या या कारवाईत सुमारे ३५ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात २१ लाखांची रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच अमेरिकन नागरिकांचा संवेदनशील डेटा हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्राथमिक तपासानुसार, ‘श्रीसाई लॉजिस्टीक्स अँड कन्सल्टन्स एलएलपी’ या नावाने हे कॉल सेंटर फेब्रुवारी २०२६ पासून कार्यरत होते. नागरिकांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अमेरिकन नागरिकांना फोन करून “तुमच्या नावाने ॲमेझॉनवर खरेदी झाली आहे”, “तुम्ही आर्थिक गैरव्यवहारात अडकलात” किंवा “तुमच्यावर डिजिटल अरेस्टची कारवाई होणार” अशा धमकीवजा आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सांगून भीती निर्माण करत होते. संशय दूर करण्यासाठी बनावट ऑर्डर क्रमांक, संदेश आणि तांत्रिक माहिती पाठवून विश्वास संपादन केला जात होता. त्यानंतर गिफ्ट कार्ड खरेदी किंवा डॉलर व्यवहारांच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
विशेष म्हणजे, रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत हे कॉल सेंटर कार्यरत असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे. छोट्या शहरात अशा प्रकारचे कामकाज सुरू ठेवल्यास सहज संशय येणार नाही, या उद्देशानेच कोरेगावची निवड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह संबंधित कलमान्वये कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अमेरिकन नागरिकांचा डेटा आरोपींपर्यंत कसा पोहोचला, आतापर्यंत किती आर्थिक उलाढाल झाली, पैशांचे हस्तांतरण कोणत्या मार्गाने होत होते आणि या रॅकेटमागील सूत्रधार कोण आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या सायबर फसवणुकीचे धागेदोरे परदेशाशी संबंधित असल्याने राज्य, केंद्र आणि आवश्यकतेनुसार आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या समन्वयाची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
टीप : प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे.
