कायद्याच्या चौकटीत बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन! तात्पुरत्या कत्तलखान्यांसाठी परवानगी अनिवार्य!– जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश

राजकारण मीडिया:सातारा: दि. २२/०५/२०२६: प्रभाकर करचे: आगामी २८ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या कुर्बानीसंदर्भातील सर्व प्रक्रिया कायदेशीर तरतुदींनुसार आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडाव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत. शहरी भागातील तात्पुरत्या कत्तलखान्यांसाठी संबंधित नगरपालिकांकडे, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतींकडे आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

बकरी ईदपूर्व तयारी आणि प्राणी संरक्षणाशी संबंधित उपाययोजनांच्या आढाव्यासाठी आयोजित प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. शिवतेज हॉल येथे झालेल्या या बैठकीस पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना तात्पुरत्या कत्तलखान्यांमध्ये आवश्यक स्वच्छता, पाणी, निर्जंतुकीकरण आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व नगर परिषद व नगर पंचायतींच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अंतर्गत लागू असलेल्या नियमांची माहिती संबंधितांना देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जनावरांच्या वाहतुकीबाबतही प्रशासनाने कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. वाहतूक अधिनियम १९७८ मधील नियम ४७ नुसार कुर्बानीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांची वाहतुकीपूर्वी अधिकृत पशुवैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असून त्यासाठी सक्षम पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनीही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देत महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१५ अंतर्गत गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवरील निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाला दिल्या. कुर्बानीनंतर स्वच्छता राखून इतर नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

बकरी ईद हा धार्मिक श्रद्धेचा उत्सव असला तरी तो कायद्याच्या चौकटीत, सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्था जपत साजरा व्हावा, हा प्रशासनाचा प्रमुख संदेश या बैठकीतून देण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!