राजकारण मीडिया: फलटण: दिनांक:१३/०५/२०२६: प्रभाकर करचे:फलटण तालुक्यातील श्री जितोबा बगाडा नगरी म्हणून ओळख असलेल्या जिंती गावाने पर्यावरण संवर्धनाकडे मोठे पाऊल टाकत “हरित जिंती” अभियानाची घोषणा केली आहे. गावातील नागरिक, युवक, ग्रामस्थ व विविध सामाजिक घटकांच्या सहभागातून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तब्बल १० हजार झाडांची भव्य लागवड करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
“गावाचा विकास आणि पर्यावरणाचा श्वास” हा संदेश देत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात स्थानिक पातळीवर वृक्षसंवर्धन, पर्यावरण जागरूकता आणि भविष्यातील हरित गाव उभारणीवर भर दिला जाणार आहे. “एक झाड – एक जीवन” या संकल्पनेतून प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गावातील सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याकडेला मोकळी जागा, शाळा परिसर, स्मशानभूमी, शेतबांध तसेच उपलब्ध शासकीय जागांवर विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे समजते. वृक्ष लागवडीनंतर त्यांचे संरक्षण आणि नियमित देखभाल यासाठी स्वतंत्र नियोजनही करण्यात येणार आहे.
पर्यावरण संतुलन राखणे, भूजल पातळी वाढविणे, प्रदूषण कमी करणे आणि पुढील पिढीसाठी हरित वारसा निर्माण करणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जिंती ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत असून, इतर गावांसाठीही हा आदर्श ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
