राजकारण मीडिया:सातारा:दि. १२/०७/२०२६ : प्रभाकर करचे: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने सर्वंकष तयारी पूर्ण केली असून, वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाडेगाव येथील दत्त घाट तसेच लोणंद येथील पालखीतळाला प्रत्यक्ष भेट देत विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे, फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई यांनी वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देताना पिण्याच्या पाण्याचा कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही, यासाठी अतिरिक्त टँकरची व्यवस्था करण्यास सांगितले. टँकरसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या स्रोतांची गुणवत्ता तपासूनच पाणीपुरवठा करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
आरोग्य विभागाने पालखी मार्गावर अधिकाधिक फिरती वैद्यकीय पथके कार्यरत ठेवावीत, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत वारकऱ्यांना तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पालखी मार्गावर सक्षम पोलीस बंदोबस्त ठेवून आवश्यकता भासल्यास शेजारील जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस बळ उपलब्ध करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती देणारे दिशादर्शक व माहिती फलक महत्त्वाच्या ठिकाणी उभारावेत, तसेच संपूर्ण पालखी मार्गावर स्वच्छता व्यवस्थेला विशेष प्राधान्य द्यावे, असेही पालकमंत्र्यांनी नमूद केले. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून जबाबदारीने कार्य करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचे टँकर, तात्पुरती स्वच्छतागृहे, सुसज्ज रुग्णवाहिका तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रत्येक दिंडीशी सातत्याने संपर्क राहावा यासाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, १५ ते १९ जुलै या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणारा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भक्तिमय, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी सर्व विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज आहे
