पीककर्ज वितरणात साताऱ्याची राज्यात दमदार झेप! आता पहिल्या क्रमांकाचे लक्ष्य!

राजकारण मीडिया:सातारा: दि. ३०/०६/२०२६: प्रभाकर करचे: सातारा जिल्ह्याने पीककर्ज वितरणात राज्यात तिसरा क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली असून, चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत आणि अखंडित कर्जपुरवठा करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी सर्व बँकांनी समन्वयाने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आरबीआयचे प्रतिनिधी राजेंद्र कनीशेट्टी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नितीन तळपे, बँक ऑफ महाराष्ट्रचे अचल प्रबंधक राहुल जोशी, ग्रामीण विकास यंत्रणेचे विश्वास सिद्ध तसेच विविध बँका व महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला ३,८०० कोटी रुपयांच्या पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३,३१५ कोटी ५८ लाख रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले असून, उद्दिष्टाच्या सुमारे ८७ टक्के पूर्ततेमुळे सातारा जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. यामध्ये खरीपासाठी २,१११ कोटी ५६ लाख तर रब्बीसाठी १,२०४ कोटी २ लाख रुपये कर्ज वितरित करण्यात आले. विशेष म्हणजे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकट्याने २,२१८ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

चालू आर्थिक वर्षात खरीपासाठी २,३७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, १५ जून २०२६ पर्यंत १ लाख ७३ हजार ८६९ शेतकरी खातेदारांना १,२८३ कोटी ५५ लाख रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे. जुलैअखेरपर्यंत शंभर टक्के कर्जवाटप पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकऱ्याला कर्जापासून वंचित ठेवू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिल्या.

बैठकीत मत्स्यव्यवसायासाठी विविध बँकांकडे पाठविण्यात आलेल्या १९० प्रस्तावांचा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी), पीएमएफएमई, महिला बचत गट विस्तार तसेच विविध महामंडळांच्या प्रलंबित प्रस्तावांचाही आढावा घेण्यात आला. रोजगारनिर्मिती व स्वयंरोजगाराशी संबंधित योजनांमध्ये प्रस्तावांवर वेळेत निर्णय घेऊन लाभार्थ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

यावर्षी १६ हजार नवीन महिला बचत गट स्थापन करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून, संबंधित विभागांनी ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!