राजकारण मीडिया:फलटण: दिनांक:२२/०५/२०२६: प्रभाकर करचे | फलटणमधील यशवंत सहकारी बँकेच्या आर्थिक अनियमिती प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळाले असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेचा परवाना रद्द करत कामकाजावर पूर्णविराम दिला आहे. १९ मे २०२६ पासून बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले असून, या निर्णयामुळे ठेवीदार आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
आरबीआयने बँकिंग नियमन कायदा १९४९ अंतर्गत ही कारवाई केली आहे. बँकेकडे आवश्यक भागभांडवलाचा अभाव, आर्थिक निकषांचे उल्लंघन आणि ठेवीदारांच्या हिताला संभाव्य धोका या कारणांवर ही कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या आदेशानंतर बँकेला नवीन ठेवी स्वीकारणे, विद्यमान ठेवी परत करणे किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच राज्य सहकार विभागाला बँकेची लिक्विडेशन प्रक्रिया सुरू करून प्रशासकीय पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, ठेवीदारांसाठी काहीसा दिलासादायक मुद्दा म्हणजे ठेवी विमा आणि पतहमी योजनेअंतर्गत पात्र खातेदारांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण लागू राहणार आहे. उपलब्ध माहितीनुसार मोठ्या प्रमाणातील ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यशवंत बँक प्रकरण यापूर्वीही कथित आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळ्याच्या आरोपांमुळे चर्चेत होते. आता परवाना रद्द झाल्याने या प्रकरणावर कायदेशीर आणि प्रशासकीय शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात असून, सहकार क्षेत्रात आर्थिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
*ठेवीदारांचे लक्ष आता लिक्विडेशन प्रक्रिया आणि विमा परताव्याकडे; सहकार व्यवस्थेसाठीही हा इशारा मानला जात आहे.*
