राजकारण मीडिया: फलटण: दिनांक:१४/०५/२०२६: प्रभाकर करचे:फलटण तहसील कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला अखेर सकारात्मक यश मिळाले. तब्बल चार तास चाललेल्या चर्चेनंतर प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. “प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया आंदोलनातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी काही आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती. शासकीय वैद्यकीय पथकाने उपोषणस्थळी भेट देत तपासण्या केल्या. दरम्यान, आंदोलन अधिक तीव्र होत असताना पोलिसांकडून काही आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला.
विशेष म्हणजे, आंदोलनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक प्रमुख लोकप्रतिनिधींनी उपोषणस्थळी भेट न दिल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. मात्र नंतर विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी मध्यस्थी करत प्रशासनावर दबाव वाढवला. पत्रकार बांधवांच्या मध्यस्थीनंतर तहसीलदारांसोबत सकारात्मक चर्चा पार पडली.
अखेर तहसीलदार अभिजित जाधव यांच्या हस्ते आंदोलनकर्त्यांनी लिंबू सरबत स्वीकारत उपोषण मागे घेतले. या आंदोलनामुळे फलटण तालुक्यातील दिव्यांगांच्या प्रश्नांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
