जनगणना 2027 दोन टप्प्यांत! पहिला टप्पा 16 मे ते 15 जून!

राजकारण मीडिया: फलटण: दिनांक 7 मार्च 2026: प्रभाकर करचे:भारत सरकारकडून जनगणना 2027 दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामधील पहिला टप्पा 16 मे ते 15 जून 2026 या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.

या कालावधीत प्रगणक (Enumerator) त्यांना नेमून दिलेल्या गाव किंवा परिसराला भेट देऊन घरगणना (House Listing) करणार आहेत. घरगणना करताना शासनाने निश्चित केलेले 34 प्रश्न घरातील प्रमुख व्यक्ती किंवा उपस्थित सदस्याला विचारून संबंधित माहिती जनगणना पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे.

दरम्यान, 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना census.gov.in/se या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची व आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाइन भरता येणार आहे.

जनगणना 2027 चा दुसरा टप्पा 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2027 दरम्यान होणार असून या कालावधीत प्रत्यक्ष लोकसंख्येची नोंद (Population Enumeration) केली जाणार आहे.

भारत सरकारकडून जनगणना 2027 साठी व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे. जनगणना हा देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय व सांख्यिकीय उपक्रमांपैकी एक मानला जातो. या प्रक्रियेद्वारे देशातील लोकसंख्येची अद्ययावत व अचूक माहिती संकलित केली जाते.

या वेळी जनगणना पूर्णतः डिजिटल पद्धतीने होणार असून माहिती संकलनाची प्रक्रिया अधिक जलद, अचूक व पारदर्शक करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

सातारा जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी तहसीलदार तर शहरी भागासाठी मुख्याधिकारी हे चार्ज अधिकारी असतील. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनगणना करण्यासाठी सुमारे 5,500 प्रगणक नेमले जाणार आहेत.

सातारा जिल्ह्यासाठी प्रधान जनगणना अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संतोष पाटील, तर जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी काम पाहणार आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!