दूध दरात उसळी!शेतकऱ्यांच्या खात्यात गोड वाढ !उन्हाळ्यात आणखी तेजीचे संकेत!

राजकारण मीडिया | फलटण :प्रभाकर करचे | दिनांक : 13 फेब्रुवारी 2026:राज्यात दूध बाजारात अचानक गोड बातमी आली असून गायीच्या दूध खरेदी दरात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या शेतकऱ्यांना सरासरी प्रति लिटर ३८ रुपये दर मिळत असून पुढील काळात ही वाढ कायम राहण्याची शक्यता डेअरी क्षेत्रातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

उपपदार्थांच्या तेजीचा थेट फायदा

हवामान व उत्पादनाचा परिणाम लोणी आणि दूध भुकटीच्या बाजारात सध्या जोरदार तेजी दिसत आहे.

दूध भुकटी दरात १५–२० रुपये प्रति किलो वाढ होऊन भाव २७५ रुपयांपर्यंत पोहोचले.

लोण्याचे दर ५०० वरून ५१५ रुपये झाले.

या वाढत्या दरांमुळे डेअरी कंपन्यांना अधिक महसूल मिळत असून त्याचा फायदा थेट दूध उत्पादकांना मिळू लागला आहे.

यंदा मॉन्सून उशिरा आल्यामुळे चाऱ्याचे नियोजन चांगले झाले आणि शेतकऱ्यांनी दुभत्या जनावरांची संख्या टिकवून ठेवली. त्यामुळे पुरवठा स्थिर राहिला. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच आइस्क्रीम व दुग्धजन्य पदार्थ उद्योगांनी कच्च्या मालाची खरेदी वाढवली आहे. मार्च ते मे या काळात उपपदार्थांना मागणी वाढण्याचा अंदाज आहे.

स्पर्धेत स्थानिक प्रकल्प सक्षम

बाजारात अमूल व नंदिनीसारख्या मोठ्या ब्रँड्समुळे स्थानिक डेअरी उद्योगांवर दबाव होता. मात्र स्थानिक प्रकल्पांनी उत्पादन, प्रक्रिया व मार्केटिंगमध्ये सुधारणा केल्याने ही स्पर्धा आता नियंत्रित असल्याचा दावा संघटनांनी केला आहे.

दरवाढीचे संकेत

संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले,“गेल्या महिन्यातच प्रति लिटर २ ते ३ रुपयांची वाढ झाली आहे. सध्याची बाजारस्थिती पाहता तेजी कायम राहण्याची चिन्हे आहेत.”

तर चितळे डेअरी उद्योग समूहचे संचालक श्रीपाद चितळे यांनी सांगितले,

“सध्या गायीच्या दूधाला सरासरी ३८ रुपये आणि म्हशीच्या दूधाला ५६ रुपयांहून अधिक दर मिळतो आहे. लोणी-भुकटी दर मजबूत राहिले तर आणखी वाढ शक्य आहे.”

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!