राजकारण मीडिया: फलटण: दिनांक: १०/०२/२०२६: प्रभाकर करचे:फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर होताच स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने जिल्हा परिषद गटांमध्ये स्पष्ट आघाडी घेत सत्ता स्थापनेचा मजबूत पाया रचला, तर पंचायत समितीच्या गणांमध्ये भाजप–राष्ट्रवादी युती व शिवसेना यांच्यात शेवटच्या मतापर्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला.
फलटण तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांपैकी पाच गटांमध्ये शिवसेनेने विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपला दोन गटांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका गटात यश मिळाले.
जिल्हा परिषद गट – निकालांचा थरारतरडगाव गट – शिवसेनेचे गिरीश बनकर यांनी भाजपचे सूर्यकांत खरात यांचा 964 मतांनी पराभव केला.साखरवाडी–पिंपळवाडी गट – शिवसेनेच्या रूपाली सरगर यांनी भाजपच्या संचिता कांबळे यांचा 850 मतांनी पराभव केला.
विडणी गट – शिवसेनेच्या ज्योती मोरे यांनी राष्ट्रवादीच्या सुषमा मोरे यांचा अवघ्या 93 मतांनी पराभव करत श्वास रोखून धरणारा विजय मिळवला.
गुणवरे गट – राष्ट्रवादीच्या ऋतुजा जगताप यांनी शिवसेनेच्या हेमलता जगताप यांचा 2529 मतांनी पराभव केला.
बरड गट – शिवसेनेच्या वैशाली कांबळे यांनी भाजपचे भाऊसाहेब मोरे यांचा 2085 मतांनी पराभव केला.
कोळकी गट – शिवसेनेचे सह्याद्री कदम यांनी भाजपचे जयकुमार शिंदे यांचा 3000 मतांनी सपशेल पराभव केला.
वाठार निंबाळकर गट – भाजपचे विष्णू लोखंडे यांनी शिवसेनेचे निलेश लोखंडे यांचा 3045 मतांनी पराभव केला.
हिंगणगाव गट – भाजपचे किरण नलवडे यांनी शिवसेनेच्या सारिका अनपट यांचा 181 मतांनी पराभव केला.
फलटण पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये निकाल अत्यंत चुरशीचे ठरले. काही गणांमध्ये अवघ्या काही मतांनी तर काही ठिकाणी हजारांहून अधिक मतांच्या फरकाने उमेदवारांचा विजय झाला.
पंचायत समिती गण निकालांचा थरार
पाडेगाव गणात शिवसेनेचे राहुल नरुटे यांनी भाजपचे अमोल खराडे यांचा ६५३ मतांनी पराभव केला.
तरडगाव गणात शिवसेनेच्या योगिता गायकवाड यांनी भाजपच्या स्मिता गायकवाड यांचा ७६२ मतांनी पराभव केला.
साखरवाडी–पिंपळवाडी गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवांजली भोसले यांनी शिवसेनेच्या कमलताई माडकर यांचा २१४० मतांनी पराभव केला.
सस्तेवाडी गणात शिवसेनेचे गणेश तांबे यांनी भाजपचे विजय भिसे यांचा अवघ्या ३५ मतांनी पराभव करत निवडणुकीतील सर्वात चुरशीचा विजय नोंदवला.
सांगवी गणात शिवसेनेच्या पुष्पा चोपडे यांनी राष्ट्रवादीच्या सारिका सोडमिसे यांचा २७३ मतांनी पराभव केला.
विडणी गणात भाजपचे सचिन अभंग यांनी शिवसेनेचे डॉ. किरण शेंडे यांचा १४३ मतांनी पराभव केला.
गुणवरे गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वनिता आढाव यांनी शिवसेनेच्या वैशाली कांबळे यांचा ७१५ मतांनी पराभव केला.
आसू गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार यांनी शिवसेनेचे भीमराव पवार यांचा ५८ मतांनी पराभव केला.
बरड गणात शिवसेनेच्या स्वाती आटोळे यांनी भाजपच्या अनिता गावडे यांचा ४२५ मतांनी पराभव केला.
दुधेबावी गणात शिवसेनेच्या विजया सोनवलकर यांनी भाजपच्या मनीषा सोनवलकर यांचा १२०४ मतांनी पराभव केला.
कोळकी गणात भाजपचे विकास नाळे यांनी शिवसेनेचे अशोक नाळे यांचा १३३ मतांनी पराभव केला.
जाधववाडी गणात शिवसेनेचे अमोल सस्ते यांनी भाजपचे युवराज सस्ते यांचा ७०९ मतांनी पराभव केला.
वाठार निंबाळकर गणात भाजपच्या शुभांगी शिंदे यांनी शिवसेनेच्या स्वाती तरटे यांचा ३७८ मतांनी पराभव केला.
सुरवडी गणात भाजपचे धनंजय साळुंखे यांनी शिवसेनेचे किरण साळुंखे यांचा ११९० मतांनी पराभव केला.
सासवड गणात शिवसेनेचे संतोष कारंडे यांनी भाजपचे संतोष खताळ यांचा १३५ मतांनी पराभव केला.
हिंगणगाव गणात भाजपच्या सीमा सुरेश भोईटे यांनी शिवसेनेच्या सीमा शरद भोईटे इनामदार यांचा ४५० मतांनी पराभव केला.
फलटण पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये निकाल अक्षरशः शेवटच्या फेरीत ठरले. शिवसेनेने ८, भाजपने ५ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३ गणांमध्ये विजय मिळवला.
सस्तेवाडी (३५ मते), आसू (५८ मते), सासवड, विडणी आणि हिंगणगाव या गणांमध्ये निकाल शेवटपर्यंत लटकले होते. काही ठिकाणी एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या मतांनी पराभव–विजय ठरला.
जातीय समीकरणे, नियोजन आणि राजकीय ताकदीची कसोटी :या निवडणुकीत जातीय समीकरणांच्या आधारावर मतदान झाले असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युती आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष इतका तीव्र होता की, प्रत्येक मताला सोन्याची किंमत मिळाली.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने तयार होत असलेली ‘परिवर्तनाची लाट’ थोपवण्यात माजी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि मार्केट कमिटीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या काटेकोर नियोजनाचा मोठा वाटा राहिला.
प्रशासनाचे अचूक नियोजन व चोख पोलीस बंदोबस्तामुळे मतमोजणी प्रक्रिया पूर्णतः शांततेत पार पडली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.👉 एकंदरीत फलटण तालुक्यातील या निवडणुकीने येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय रणधुमाळीची नांदी दिली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
