फलटण परिसरात दुर्मिळ देशी वृक्षांच्या बियाणे संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!मानव निर्मित वनव्यांविरोधात कारवाईची मागणी!

राजकारण मीडिया:फलटण: दि. ७ मे २०२६: प्रभाकर करचे:नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी यांच्या वतीने फलटण तालुक्यातील कुळकजाई परिसर तसेच डोंगररांगांमध्ये आयोजित करण्यात आलेला “बियाणे संकलन उपक्रम” मोठ्या उत्साहात पार पडला. पर्यावरणप्रेमी नागरिक, स्वयंसेवक आणि संस्थेच्या सदस्यांनी एकत्र येत स्थानिक देशी वृक्षांच्या संवर्धनासाठी दुर्मिळ व उपयुक्त बियांचे संकलन केले.

या मोहिमेत हिवर, खैर, करवंद, आराटी यांसारख्या पारंपरिक वनस्पतींसह अईन, अर्जुन, बेहडा, तेंदू, आपटे, करू, रोहितक तसेच दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या “रोहन (रक्त रोहिडा)” वृक्षांच्या बियांचे मोठ्या प्रमाणावर संकलन करण्यात आले. संस्थेच्या मते, या बियांपासून भविष्यात स्थानिक जैवविविधतेला पूरक अशी नवीन हरित पट्टी उभारण्याचा मानस आहे.

मात्र या उपक्रमादरम्यान समोर आलेले वास्तव धक्कादायक होते. ज्या डोंगर परिसरात बियांचे संकलन करण्यात आले, त्या भागातील मोठा भूभाग जळालेल्या अवस्थेत आढळून आला. अनेक टेकड्यांवर जाणीवपूर्वक वनवा लावल्याचे स्पष्ट चिन्हे दिसून आली. स्थानिक नागरिकांनीही दरवर्षी काही अज्ञात व्यक्तींकडून मुद्दाम वनवा लावला जात असल्याचा आरोप केला.

पर्यावरण अभ्यासकांच्या मते, अशा प्रकारचे मानव निर्मित वनवे हे केवळ पर्यावरणासाठी नव्हे तर वन्यजीव, भूजल, मृदा संवर्धन आणि स्थानिक हवामानासाठीही गंभीर धोका आहेत. सतत होणाऱ्या आगीमुळे नैसर्गिक पुनरुत्पादन प्रक्रिया थांबते, जैवविविधता नष्ट होते आणि अनेक पक्षी व प्राणी अधिवास गमावतात.

⚖️ वनवा लावणे हा दंडनीय गुन्हा

भारतीय वन अधिनियम 1927 तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत जंगल किंवा वनक्षेत्रात जाणीवपूर्वक आग लावणे हा दंडनीय गुन्हा मानला जातो. दोषींवर दंड, नुकसानभरपाई तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते. पर्यावरणप्रेमींनी या घटनांची गंभीर दखल घेऊन वन विभागाने तत्काळ तपास करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

संस्थेच्या सदस्यांनी सांगितले की, “आज गोळा केलेली बियाणे म्हणजे फक्त बीज नाहीत; ती उद्याच्या जंगलाची पायाभरणी आहेत. डोंगर जळाले असले तरी निसर्ग पुन्हा उभा राहू शकतो—फक्त त्यासाठी समाजाने सजग होणे गरजेचे आहे.”

🌱 “निसर्ग वाचवणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर भविष्यातील अस्तित्वाची हमी आहे.”

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!