राजकारण मीडिया: फलटण: दिनांक२३/०१/२०२६: प्रभाकर करचे : फलटण तालुक्यातील मौजे सोमंथळी हद्दीतील अनैतिक प्रेमसंबंधाच्या कारणावरून एका युवकाचा पूर्वनियोजित कट रचून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना फलटण ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणली आहे. खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मयताचे नाव सतीश उर्फ आप्पा दादासो दडस (वय २७, रा. मौजे सोमंथळी, ता. फलटण) असे आहे. तो दिनांक १४ जानेवारी २०२६ पासून बेपत्ता होता. याबाबत त्याचा भाऊ सागर दडस यांनी दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मिसिंग क्र. ११/२०२६ नोंदवली होती.
मिसिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान मयताचा घातपात झाल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार गोपनीय, तांत्रिक व मानवी स्रोतांच्या आधारे तपास अधिक गतीने करण्यात आला. तपासात असे निष्पन्न झाले की, विडणी येथील महिला आरोपी रेखा लक्ष्मण बुधावले हिचे प्रथम सतीश तुकाराम माने याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र त्यानंतर तिचे मयत सतीश दडस याच्याशी अनैतिक संबंध निर्माण झाले. या कारणावरून आरोपींच्या मनात तीव्र राग व सूडभावना निर्माण झाली.
तपासादरम्यान पोलिसांनी लखन बंडू बुधावले व सतीश तुकाराम माने यांना ताब्यात घेतले. प्रारंभी त्यांनी गुन्हा नाकारत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तपासात महिला आरोपी रेश्मा लखन बुधावले हिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी चौकशीत तिने गुन्ह्याची सविस्तर कबुली दिली.
कबुलीप्रमाणे, दिनांक १४/०१/२०२६ रोजी प्रेमसंबंधाच्या कारणावरून मयत सतीश दडस याचा आरोपी सतीश माने व लखन बुधावले यांच्याशी वाद झाला. त्या वेळी लोखंडी रॉडने जबर मारहाण करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी नेत असल्याचा बनाव करून त्याला विडणी येथील मांगोबा माळ परिसरात नेण्यात आले व तेथे डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला.
गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी तिघांनी मिळून लाकूड कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे दोन पोत्यांमध्ये भरून साठे गावच्या हद्दीतील शेततळे तसेच नीरा नदीच्या पात्रात वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांनी हा अत्यंत गंभीर, अमानुष व समाजमन सुन्न करणारा गुन्हा अवघ्या चार तासांत उघडकीस आणून आरोपींना अटक केली आहे. सदर कारवाई मा. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधीक्षक, व मा. विशाल खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, शिवानी नागवडे, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार प्रदीप खरात, वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, विक्रम बनकर, गणेश यादव, संदीप मदने, अमोल चांगण, श्रीनाथ कदम, हनुमंत दडस, तुषार नलवडे, गणेश ठोंबरे, शिवराज जाधव, अमोल देशमुख, सुरज काकडे, अविनाश शिंदे, यु. आर. पेदाम व गौरी सावंत यांनी बजावली.
या धडाकेबाज कामगिरीमुळे फलटण ग्रामीण पोलिसांची तपासक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
