फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ! दोन गावठी पिस्तुलांसह चार आरोपी जेरबंद!₹२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त!

राजकारण मीडिया | प्रभाकर करचे

फलटण, दि. ०७ जून २०२६

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि त्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीविरोधात धडक कारवाई करत दोन गावठी पिस्तुलांसह चार आरोपींना अटक केली असून सुमारे ₹२ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध शस्त्र व्यवहारांवर मोठा आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील एक संशयित व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन फलटण तालुक्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सापळा रचून दुचाकीवरून येणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आरोपींकडून दोन गावठी पिस्तुले, दोन जिवंत काडतुसे, एक पल्सर मोटारसायकल आणि तीन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपींनी शस्त्रांची खरेदी-विक्री केल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी आणखी आरोपींना अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला.

अटक करण्यात आलेले आरोपी

प्रतीक प्रमोद खुंटे (रा. मांढकी, ता. पुरंदर, जि. पुणे)

प्रदीप ऊर्फ सोन्या संतोष गोरे (रा. काळूबाईनगर, साखरवाडी, ता. फलटण)

करण कानिफ घोलप (रा. मंगळवार पेठ, फलटण)

समीर ऊर्फ वर्धन बाळासो खवळे (रा. मांडवखडक, ता. फलटण)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक पातळीवर सुरू असून शस्त्र पुरवठा साखळीचा शोध घेतला जात आहे

.ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे , अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार ,व नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, हनुमंत दडस, सुरज काकडे, गणेश यादव, विक्रम बनकर, तुषार नलावडे, अमोल देशमुख या कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.

अवैध शस्त्र बाळगणे व त्यांचा व्यवहार करणे हा गंभीर व कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा फलटण ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!