कृषी प्रक्रिया उद्योगांच्या बळकटीकरणातून सातारा जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना— जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे प्रतिपादन

राजकारण मीडिया:सातारा : दिनांक:०३/०६/२०२६: प्रभाकर करचे: कृषीपूरक उद्योग, मूल्यवर्धित उत्पादने, आधुनिक तंत्रज्ञान आणि ब्रँडिंगच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून कृषी प्रक्रिया उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉफी विथ कलेक्टर’ या अभिनव उपक्रमांतर्गत कृषी उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), पीएमएफएमई योजनेचे लाभार्थी तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यात आला. या बैठकीत कृषी प्रक्रिया उद्योगांसमोरील अडचणी, बाजारपेठेतील संधी, ब्रँडिंग, पॅकेजिंग, निर्यात प्रक्रिया आणि मूल्यवर्धन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सातारा जिल्ह्याची ओळख बनत असलेल्या स्ट्रॉबेरीसह रासबेरी, मलबेरी आणि ब्लूबेरी या बेरी पिकांचा राज्य फलोत्पादन विकास कार्यक्रमामध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.

शेतकरी आणि कृषी उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रक्रिया उद्योग उभारणी, उत्पादनांचे ब्रँडिंग आणि जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उद्योगांना चालना मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होऊन रोजगारनिर्मितीलाही मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमामुळे प्रशासन आणि कृषी उद्योजक यांच्यात थेट संवाद निर्माण होऊन कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!