80 हजार लिटर क्षमतेची पाणीटाकी कोसळली! निकृष्ट कामाचा बळी ठरली जनतेच्या पैशांची उधळपट्टी?

राजकारण मीडिया: फलटण: दिनांक: ०३/०६/२०२६: प्रभाकर करचे:सांगवी-माळेवाडी (शेंडे वस्ती), तालुका फलटण येथे सन 2019 मध्ये उभारण्यात आलेली सुमारे 80 हजार लिटर क्षमतेची उंच पिण्याच्या पाण्याची टाकी अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने ही दुर्घटना घडली त्यावेळी परिसरात कोणतीही व्यक्ती नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे संबंधित बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टाकी कोसळल्यानंतर तिच्या अवशेषांमध्ये मोठ्या प्रमाणावर उघडे पडलेले लोखंडी गज, तडे गेलेले काँक्रीट आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे पुरावे स्पष्टपणे दिसून येत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, बांधकामादरम्यान आवश्यक त्या प्रमाणात क्युरिंग (पाणी मारणे) करण्यात आले नाही तसेच कमी जाडीचे आणि निकृष्ट दर्जाचे लोखंडी गज वापरण्यात आल्यानेच ही टाकी कोसळली असावी.

घटनास्थळी अधिकाऱ्यांची धाव

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, पंचायत समिती फलटण तसेच जिल्हा परिषद सातारा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासणी सुरू करण्यात आली असून कोसळण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक अहवाल मागविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

जनतेचा सवाल : दोषींवर कारवाई होणार का?

अवघ्या 6-7 वर्षांत कोट्यवधी रुपयांच्या योजनांमधून उभारलेली पाणीटाकी जमीनदोस्त होत असेल तर कामाची गुणवत्ता, देखरेख करणारे अधिकारी, कंत्राटदार आणि तांत्रिक मंजुरी देणाऱ्या यंत्रणांची जबाबदारी निश्चित होणार का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की,

टाकीच्या बांधकामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्यात यावी.

संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी.

शासनाच्या निधीची झालेली हानी वसूल करण्यात यावी.

परिसरातील इतर पाणीपुरवठा योजनांचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे.

कायद्याच्या चौकटीत चौकशीची मागणी

तज्ज्ञांच्या मते, जर चौकशीत निकृष्ट दर्जाचे काम, शासकीय निधीचा अपव्यय किंवा निष्काळजीपणा सिद्ध झाला तर संबंधितांवर भारतीय न्याय संहिता (BNS) मधील निष्काळजीपणा, सार्वजनिक निधीची हानी तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची शक्यता आहे.

संपादकीय टिप्पणी

“जनतेच्या करातून उभारलेल्या विकासकामांचे आयुष्य अवघ्या काही वर्षांचेच असेल, तर विकासाच्या दाव्यांवर विश्वास ठेवायचा कसा? सांगवी-माळेवाडी येथील कोसळलेली पाणीटाकी ही केवळ काँक्रीटची रचना नसून शासकीय कामांच्या गुणवत्तेवर उभे राहिलेले गंभीर प्रश्नचिन्ह आहे. आता चौकशीचा अहवाल येण्यापूर्वीच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार की दोषींवर खऱ्या अर्थाने कारवाई होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.”

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!