फलटण पंचायत समितीत ओबीसींना डावलल्याची खदखद; तातडीची बैठक आजच!

राजकारण मीडिया:फलटण : दिनांक: १७/०३/२०२६: प्रभाकर करचे : पंचायत समिती फलटणच्या सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेनंतर ओबीसी समाजामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. समितीत तब्बल ९ सदस्य असतानाही ओबीसी समाजाला नेतृत्वाच्या संधीपासून दूर ठेवण्यात आल्याची भावना व्यक्त होत असून, “तोंडाला पाने पुसली” अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

विशेष म्हणजे, ओबीसी समाजातील धनगर व माळी हे प्रमुख घटक असताना, सभापती पदासाठी धनगर समाजातील उमेदवार दोन्ही प्रमुख पक्षांकडून दावेदार होते. मात्र, अखेरच्या क्षणी सर्व घडामोडी गुप्त ठेवत निर्णय घेतल्याने ओबीसी समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे.

स्थानिक पातळीवर असा आरोप केला जात आहे की, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ओबीसी घटकांचा वापर करून सत्ताधारी आपले राजकारण साधतात—कधी माळी, कधी धनगर, तर कधी बौद्ध समाज—मात्र सत्तेच्या वाटपात मात्र या समाजांना दुय्यम स्थान दिले जाते. यामुळे ओबीसी समाजामध्ये “एकजूट नसल्यामुळेच अन्याय होतो” अशी आत्मपरीक्षणाचीही भावना व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर, ओबीसी समाजाच्या वतीने तातडीची बैठक आयोजित करण्यात आली असून, पुढील भूमिका ठरविण्यावर भर दिला जाणार आहे. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आज (दि. १७ मार्च) सकाळी १०.३० वाजता फलटण येथे उपस्थित राहणार असून, मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

📍 स्थळ: शासकीय विश्रामगृह, फलटण⏰ वेळ: सकाळी १०:३० वाजता

दरम्यान, या घडामोडींना आणखी एक राजकीय कलाटणी मिळाली असून, भाजप ओबीसी सेलचे पदाधिकारी सागर अभंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ओबीसी समाजातील असंतोष अधिकच तीव्र झाल्याचे दिसत आहे.

👉 आता तरी ओबीसी समाज एकत्र येणार का? की पुन्हा एकदा राजकारणात वापरला जाणार?याकडे फलटण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!