राजकारण मीडिया:फलटण | दि. 30 जुलै 2026:प्रभाकर करचे : फलटण तालुक्यातील बरड येथील रांजणी पुनर्वसन परिसरात मानवी जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने बेकायदेशीर स्फोटकांचा साठा करून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत तब्बल 24 लाख 72 हजार 1 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. 29 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 7.50 वाजता बरड येथील रांजणी पुनर्वसन परिसरातील बंद मराठी शाळेसमोरील मैदानात एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी MH 11 CH 2555 क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता, कोणताही वैध परवाना नसताना लोकवस्तीच्या ठिकाणी स्फोटक पदार्थ निष्काळजीपणे साठवून ठेवल्याचे समोर आले.
पोलिसांनी कारवाई करत Ecoprime 83 mm चे 500 बॉक्स आणि Superpower 90 चे 4 बॉक्स, असे एकूण 504 बॉक्स स्फोटक पदार्थ, तसेच संबंधित ट्रक जप्त केला.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 454/2026 दाखल करण्यात आला असून, स्फोटके अधिनियम 1884 चे कलम 9(B)1(B), स्फोटके अधिनियम 1908 चे कलम 5 आणि भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 288 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणात शंकरलाल बेनीराम जाट (रा. बरड, ता. फलटण) आणि हेमराज महावीर जाट (मूळ रा. भिलवाडा, राजस्थान, सध्या रा. बरड) यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, हेमराज जाट याला पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे आणि पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ करीत आहेत.
लोकवस्तीच्या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा नेमका कशासाठी?
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटके कोणत्या कारणासाठी आणि कोणाच्या परवानगीने आणली होती, याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे. पोलिसांच्या तपासातून या स्फोटक साठ्यामागील नेमका उद्देश आणि संबंधितांचे आणखी काही धागेदोरे समोर येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
— राजकारण मीडिया
