साताऱ्याच्या विकासासाठी सर्व यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी एकाच दिशेने काम करावे; उदयनराजे भोसले यांचा अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा

राजकारण मीडिया:सातारा:दि. १२/०७/२०२६: प्रभाकर करचे: केंद्र शासनाच्या विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही केवळ कागदोपत्री न राहता ती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, असा स्पष्ट संदेश खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, विधान परिषदेचे आमदार धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, दिशा समितीचे प्रकल्प संचालक विश्वास सिद्ध, समिती सदस्य तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

खासदार उदयनराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, केंद्र शासनाच्या योजनांमध्ये येणाऱ्या अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि आवश्यक पाठपुराव्याबाबत लेखी प्रस्ताव सादर करावेत. त्यानुसार केंद्र स्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्यात येईल. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देत प्राथमिक शाळांमध्ये संगणक शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

आरोग्य यंत्रणेवरही त्यांनी बोट ठेवत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांतील स्वच्छता, प्रसूती सेवा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची मुख्यालयातील उपस्थिती याबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. शासनाने निश्चित केलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीएसआर निधी प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन करत, या निधीसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी संयुक्त प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.

शेतकरी हिताच्या केंद्र शासनाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यावर भर देत त्यांनी योजनांच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई होऊ नये, अशी सूचना केली.

बैठकीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची विविध विकासकामे तसेच महावितरणच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना योजनांची गुणवत्ता, गती आणि जनहित या तीन बाबींवर विशेष भर देण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!