फलटणमध्ये चौघांच्या मृत्यूप्रकरणी मोठा ट्विस्ट! केबल चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; निष्काळजीपणामुळे चार जणांचा बळी?

राजकारण मीडिया:फलटण: दिनांक :०९/०७/२०२६: प्रभाकर करचे | फलटण तालुक्यातील खामगाव-साखरवाडी येथे वीजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेला मोठे वळण मिळाले आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणात पोलिस तपासात निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित केबल चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106(1) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, ८ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजता खामगाव-साखरवाडी येथे घरासमोरील लोखंडी तारेत विद्युतप्रवाह उतरल्याने सतिश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (४५), गंगू सतिश शिंदे (४०), सचिन सतिश शिंदे (२६) आणि आरती सतिश शिंदे (२४) या चौघांचा जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर शितल सचिन शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, सखोल तपासादरम्यान संबंधित घरावरून जाणारी केबल टाकताना तिच्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी सपोर्ट वायर वीजवाहिनीला घासल्याने विद्युतप्रवाह लोखंडी तारेमध्ये उतरल्याचे निष्पन्न झाले. या निष्काळजीपणामुळेच चौघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी नोंदविला आहे.

त्यानुसार केबल चालक तात्यासो चंदर लांडगे (रा. खामगाव-साखरवाडी, ता. फलटण) याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०२/२०२६ अन्वये BNS कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत आणखी कोणाची निष्काळजीपणा किंवा जबाबदारी आहे का, याचाही पोलीस तपास सुरू असून संबंधित सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करीत आहेत.

या घटनेमुळे केबल नेटवर्क उभारणी, वीजवाहिन्यांच्या सुरक्षेचे नियम आणि संबंधित यंत्रणांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,निष्काळजीपणामुळे चार निष्पाप जीव गमावल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!