राजकारण मीडिया | फलटण | दिनांक : 20 एप्रिल 2026 | प्रभाकर करचे:फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीकडून होत असलेल्या कमी-जास्त दाबाच्या (लो-हाय व्होल्टेज) वीज पुरवठ्यामुळे शेतकरी व घरगुती ग्राहक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. अचानक व्होल्टेज वाढ-घट होत असल्याने टीव्ही, फ्रीज, पंखे, मोटार पंप, इन्व्हर्टर यांसारखी उपकरणे जळण्याच्या घटना वाढल्या असून, नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
गेल्या काही दिवसांत अनेक गावांत लाईट फ्लक्चुएशन सतत होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही ठिकाणी कमी दाबामुळे मोटार पंप सुरू होत नाहीत, तर अचानक जास्त दाब आल्याने उपकरणे जळून खाक होत आहेत. विशेषतः शेती पाणीपुरवठ्यावर याचा गंभीर परिणाम होत असून, पीक व्यवस्थापन धोक्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रारी करूनही योग्य ती दखल घेतली जात नाही. ट्रान्सफॉर्मर, लाईन मेंटेनन्स आणि व्होल्टेज कंट्रोल याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच ही समस्या निर्माण झाली आहे.”
दरम्यान, काही ग्राहकांनी नुकसानभरपाईची मागणी करत वीज वितरण कार्यालयावर धडक देण्याचा इशारा दिला आहे. “आमची उपकरणे जळत आहेत, त्याची भरपाई कंपनीने द्यावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल,” असा संतप्त सूर ग्रामस्थांनी व्यक्त केला.
तज्ञांच्या मते, जुने ट्रान्सफॉर्मर, ओव्हरलोड झालेल्या लाईन्स आणि अपुरी देखभाल यामुळे व्होल्टेजमध्ये मोठे चढ-उतार होत असतात. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
आता प्रश्न असा आहे की, वीज वितरण कंपनी या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का, की ग्राहकांना अजूनही ‘शॉक’ सहन करावा लागणार?
